बीड

वडवणी-वीज कोसळून दोघांचा मृत्यू

वडवणी दि.१२(प्रतिनिधी) आई वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहीण-भावाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वडवणी तालुक्यातील मोरवड येथे काल शुक्रवार दि.१२ रोजी घडली आहे. परवा गुरुवारपासून वडवणी तालुक्यात चांगला पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची शेतात पेरणी व कापूस लागवड अशी कामे सुरु झाली आहेत. अशातच निसर्गाच्या या विक्राळ रूपाने दोन सख्ख्या बहीण-भावांना हिरावून घेतल्याने संपूर्ण मोरवड गावावर शोककळा पसरली आहे.                        

याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या आई वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहीण-भावाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडवणी तालुक्यातील मोरवड येथे शुक्रवार दिनांक १२ जून २०२० रोजी घडली आहे. दरम्यान गुरुवारी वडवणी तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची शेतात पेरणी व कापूस लागवड सुरू झालेली दिसून येत आहे. शुक्रवारी मोरवड येथिल शेतकरी विष्णू अंडील यांच्या शेतात कापूस लागवड सुरू होती. यामध्ये विष्णू अंडील यांचा मुलगा अशोक व मुलगी पूजा हे कामात त्यांना मदत करत होते. दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाल्याने हे दोघे बहीण-भाऊ निवाऱ्यासाठी शेतातील आंब्याच्या झाडाच्या दिशेने धाव घेत त्याठिकाणी झाडाखाली थांबलेले होते. नेमके त्याच झाडावर अचानक वीज कोसळल्याने यामध्ये अशोक विष्णू अंडील (वय १७ वर्ष) व पूजा विष्णू अंडील (वय १५ वर्ष) यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. अशोक हा पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता तर मुलगी पूजा हि गावातीलच विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मुलगा कोरोनामुळे सध्या गावी आलेला होता तर पूजा शाळा बंद असल्याने घरीच होती. सध्या शिक्षण बंद असल्याने आई-वडिलांना मदत व्हावी या हेतूने ते शेतात मदतीसाठी गेले होते. मात्र त्यांच्यावर काळाने घाव घातल्याने मोरवड या गावी शोककळा पसरली असून संपूर्ण वडवणी तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.