किल्लेधारुर तालुक्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली
सेवेत सामावून घेण्यासाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन.
किल्लेधारूर दि.१२ (प्रतिनिधी) मागील पंधरा वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या मात्र अद्यापही सदरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेतले नसलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केल्याने आरोग्य यंत्रणा ऐन कोरोना संकट काळात कोलमडली आहे. आपल्य मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना सयन्वय समितीच्या वतीने कंत्री कर्मचारी व अधिकारी यांचे राज्यात आंदोलन सुरु आहे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सदरील कर्मचारी यांनी मागील दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात महाराष्ट्रात १९ हजार आरोग्य कर्मचारी व अधिकारी २००५ पासून कार्यरत आहेत. त्यामुळे २०१० पासून सदरील कर्मचारी नियमित सेवेत समायोजन करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत अनेक मोर्चे आंदोलने करूनही सदरील मागणीची दखल घेतलेली नाही. दरम्यान संबंधित प्रश्नी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली. तर एका समितीने २०१९ मध्ये समायोजन करण्याच्या बाजूने अहवाल देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हजारो कर्मचारी आपल्या हक्कापासून वंचित आहेत. दरम्यान कोरोना काळातही सदरील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. किल्लेधारुर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया समोर तालुक्यातील संघटनेच्या अध्यक्षा सोनवणे आर.एन., एस.बी. घुगे, एम.एम. पुरी, के.एम. लोखंडे, एस.बी. नरवडे, शेरखाने बी.एम., चौरे एम.बी., झांजे एस.ए., तिडके एस.एस., गिरी आर.बी., इनामदार एम.एच, राऊत एस.डी., गुट्टे, एस. बी. इत्यादी कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारून धरणे आंदोलन करत आहेत. नियमित सेवेत सामावून घेऊन सर्व लाभ देण्याची मागणी करण्यात येत आहे. तर सदरील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने ऐन कोरोनाच्या संकटात नियमित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.
आंदोलनाचा आरोग्य सेवेवर होणार परिणाम
तालुका आरोग्य सेवेत एकुण २२ कंत्राटी कर्मचारी काल पासून कार्यालयाच्या समोर काम बंद आंदोलन करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लसीकरणाच्या कमावर थेट परिणाम होणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या संघटने बरोबर वरिष्ठ पातळीवर सकारात्मक विचारविनिमय सुरू असून एक-दोन दिवसांत कांहीतरी तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया किल्लेधारुर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.