बीड

दिंद्रुड-चोरट्यांनी फोडले कृषी दुकान!

दिंद्रुड दि. 11 (प्रतिनिधी) येथे परळी बीड महामार्गानजीक असलेले किसान कृषी सेवा केंद्र हे दुकान चोरट्यांनी फोडून जवळपास एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बियाणे लंपास केले. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत डीसले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या.
याबाबत अधिक वृत्त असे की माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे दि.10 रोजी अज्ञात चोरट्यांनी शेजारच्या सलुनचा पाठीमागील दवाखाना उघडून तसेच पत्रा कापून किसान कृषी सेवा केंद्र या दुकानात प्रवेश मिळवला. विक्रीसाठी आणलेले 1 लाख 5 हजार 850 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे बियाणे चोरट्यांनी चोरून नेले. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनी अनिल गव्हाणकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली.
चोरीचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तसेच श्वानपथक व गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र चोरट्यांची किंवा त्यांनी हाताळलेली एकही वस्तू मिळून आली नसल्याने व रात्रभर पावसाची रिपरिप चालू असल्याने श्वानपथक आल्या पावली निघून गेले. दुकान मालक रामकृष्ण मुंडे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरांच्या विरोधात गु.र.न.138/20 भादवी 1960 चे कलम 561,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत डीसले यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. तसेच पोलिसांना तपासाबाबत अधिक सूचना केल्या. सदरील घटनेत किसान कृषी सेवा केंद्राच्या बाजूला असलेल्या रामेश्वर मुंडे यांच्या श्री साई मशिनरी या दुकानातील काही वस्तू सुद्धा चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. सपोनि अनिल गव्हाणकर पुढील तपास करत असून त्यांना बीट अंमलदार लोंढे सहकार्य करत आहेत. घटनेच्या पार्श्‍वभूमीवर गव्हाणकर यांनी व्यापाऱ्यांची मिटिंग घेऊन कृषी दुकानात भरपूर बियाणे असल्याने त्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.