News

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले, मुख्यमंत्र्यांनी नवी तारीख केली जाहीर

मुंबई, 10 जून : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.  अशा या परिस्थितीत पावसाळी अधिवेशन जून महिन्यात घेण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन हे 3 ऑगस्ट रोजी होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विधान भवनात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाजाच्या सल्लागार समितीसोबत बैठक पार पडली. विधान भवनाच्या हिरवळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.

या बैठकीत पावसाळी अधिवेशन किती दिवसांचे घ्यावे यावर महत्वाची चर्चा झाली. राज्यात सुरू असलेला कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात घेता. एक किंवा दोन आठवड्यांचे मर्यादीत असे हे अधिवेशन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

22 जूनपासून पावसाळी अधिवेशन होईल अशी शक्यता होती. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता निर्णय पुढे ढकल्यात आला आहे.  पावसाळी अधिवेशन आता 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 15 दिवस हे अधिवेशन चालणार आहे.

22 जूनपासून पावसाळी अधिवेशन घेणं कठीण आहे. त्यामुळे 3 ऑगस्टपासून हे पावसाळी अधिवेशन होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

तसंच, ‘पुरवणी मागणी मंजूर करून घेण्यासाठी एक दिवसाचे अधिवेशन देखील घेतले जाऊ शकते, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

या अधिवेशनात दोन्ही सभागृहातील सदस्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्यासाठीही नियोजन करण्यात येणार असल्याचं कळत आहे. विधान भवनात होत असलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे तसेच मंत्री मंडळातील इतरही मंत्री उपस्थित होते.

दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ‘3 ऑगस्टपासून विधान सभा अधिवेशन होईल. जर का पुरवणी मागण्या मंजुरी मिळवायची असेल तर एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्यावे. त्यासाठी उपस्थिती अनिवार्य नसावी. यासाठी आमची अनुमती आहे, असं जाहीर केलं.