8 दिवसांनी झाली सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ!
मुंबई, 10 जून : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन हटवण्याच्या पहिल्या टप्प्याला म्हणजेच अनलॉक 1.0ला सुरुवात झाली. आज सलग दुसऱ्या दिवशीही अनलॉक1.0मध्ये सोन्या-चांदीच्या भावात बदल झाले. आज देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 515 रुपयांनी वाढ झाली. तब्बल 8 दिवसांनी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे, याआधी 2 जून रोजी सोन्याचे दर वाढले होते. सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव आता 46 हजार 994 झाले आहेत.तर, 23 कॅरेट सोन्याचे दर 513 रुपयांनी वाढले. सराफा बाजारात आज 24 कॅरेटपासून 18 कॅरेटपर्यंत सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली. तर, चांदीच्या दरातही 35 रुपयांनी वाढ झाली आहे.
23 कॅरेट सोनं म्हणजे गोल्ड 995च्या किंमत 513 रुपयांनी वाढून 46 हजार 806 झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 427 रुपयांनी वाढ झाली आहे. यासह दर 43 हजार 047 झाले आहेत. तर, 18 कॅरेट सोन्याची किंमत 387 रुपयांनी वाढून 35 हजार 246 झाली आहे.तर, ऑगस्टच्या एमसीएक्सनुसार (MCX) भविष्यातील सोन्याच्या किंमतीत 0.07% टक्क्यांनी वाढ होऊन 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजार 628 झाली आहे. तर, चांदीच्या दरात 0.24% वाढ होऊन प्रति किलोमागे किंमत 48 हजार 215 झाली आहे.