News

समग्र शिक्षा योजनेतून 3,63,526 विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके मिळणार

बीड (प्रतिनिधी): समग्र शिक्षा अभियान अतंर्गत शैक्षणिक वर्ष सन 2020-21 वर्षाकरिता इयत्ता पहिली ते आठवीच्या 3,63,526 विद्यार्थ्याना यावर्षी मोफत पाठयपुस्तकांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये मराठी माध्यमाच्या 3,26,584 तर उर्दू माध्यमाच्या 36,942 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरण महामंडळ (बालभारती), औरंगाबाद विभागीय डेपोतून बीड जिल्हयात प्रत्यक्ष तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकांचा पुरवठा सुरू आहे. कोरोना विषाणू प्रादुभार्र्वामुळे सन 2020-21 च्या शैक्षणिक सत्रास विलंबाने सुरूवात होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु हे सत्र जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा केव्हा सुरू होणार आहेत? याचा निर्णय झाला नसला तरी, शैक्षणिक सत्राची तयारी मात्र शिक्षण विभागाच्या वतीने सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा, शासकीय शाळा, आणि खाजगी व्यवस्थापनाच्या युडायसमध्ये नोेंद असलेल्या अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पाठयपुस्तके देण्यात येणार आहेत. प्राथमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी अजय बहीर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने मोफत पाठयपुस्तके पोहोचविणे व ते विद्यार्थ्यांच्या देण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यु-डायस नुसार विद्यार्थी संख्या व उपलब्ध करून देण्यात आलेली पाठ्यपुस्तकावरून पाठ्यपुस्तकांचे काही संच शिल्लक असल्याने शिल्लक पुस्तकांची संख्या वगळता पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. पुस्तक वितरणाचे काम योग्य पध्दतीने पार पाडण्यासाठी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी, गटसमन्वयक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व विशेष शिक्षक आदींचे गट तयार करून ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दिनांक 13 जूनपर्यंंत तालुकास्तरावर तर दिनांक 13, 14, आणि 15 जून रोजी शाळास्तरावर पुस्तक वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पुस्तक वितरणाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. बालभारती पुस्तक डेपो औरंगाबाद येथून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकांची वाहतूक सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून फिजिकल डिस्टन्स ठेवून पाठयपुस्तके 11 तालुक्यासाठी पुरविण्यात येत आहेत. परळी तालुक्यातील शाळांसाठी यावर्षी प्रायोगिक तत्वावर इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यासाठी नव्याने एकात्मिक पुस्तके देण्यात येणार आहेत. बीड जिल्हयात 11 तालुक्यासाठी खालील प्रमाणे पाठ्यपुस्तकांचे संच बालभारती मंडळाकडून ऑनलाईन नोंदणीप्रमाणे पुरविण्यात आले आहेत. मराठी माध्यम विद्यार्थी संख्या- अंबाजोगाई- 35961, आष्टी- 30477, बीड- 66073, धारूर- 16349, गेवराई- 40616, केज- 31531, माजलगाव- 32082, परळी- 33143, पाटोदा- 15145, शिरूर- 14038, वडवणी- 11168,  तर उर्दू माध्यमासाठी अंबाजोगाई-5124, आष्टी- 407, बीड-16892, धारूर- 678, गेवराई- 1983, केज- 1856, माजलगाव- 3013, परळी- 6053, पाटोदा-406, शिरुर- 82, वडवणी- 406 याप्रमाणे प्रात्र विद्यार्थी संख्या आहे.  परळी तालुक्यातील शाळांसाठी यावर्षी प्रायोगिक तत्वावर इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यासाठी नव्याने एकात्मिक पुस्तके देण्यात येणार आहेत.