News

मोठी बातमी! शाळा-महाविद्यालयासाठी सम-विषम फॉर्म्युला, 6 टप्प्यात सुरू होणार

नवी दिल्ली – कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल अडीच लाखांवर गेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपासून 15 जूनपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू होणार अशी चर्चा सुरू होती. शाळा-महाविद्यालये कधी सुरू होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने  पाऊल उचललं जात आहे. एनसीईआरटीने (NCERT) पालक आणि शिक्षकांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात या संदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार शाळा उघडल्यानंतर रोलनंबरच्या आधारे सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यात येईल. दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू करण्यात येईल. शाळेत पोहोचण्यासाठी वर्गानुसार 10-10 मिनिटांच्या अंतराने विद्यार्थ्यांना वेळा ठरवून दिल्या जातील त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल असं म्हटलं आहे. 

6 टप्प्यात सुरू होणार शाळा-महाविद्यालये

– पहिल्या टप्प्यामध्ये 11 वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत

– त्यानंतर 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरू कऱण्यात येणार आहेत.

– तिसऱ्या टप्प्यात 2 आठवड्यांनंतर 6वी ते इयत्ता 8वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येतील.

– तीन आठवड्यांनंतर चौथ्या टप्प्यात तिसरी ते पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येतील.

– पाचव्या टप्प्यात पहिली आणि दुसरीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

– सहाव्या टप्प्यात नर्सरी आणि केजीचे वर्ग परवानगी मिळाल्यानंतर सुरू करण्यात येतील. रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील वर्गमात्र ग्रीन झोन होईपर्यंत बंद राहणार आहेत.

शाळांसाठी विशेष गाईडलाईन्स असणार

– वर्गात विद्यार्थ्यांमध्ये 6 फूटांचं अंतर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक

– एका वर्गात 30 ते 35 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असू नयेत.

– वर्गाची दारं-खिडक्या उघड्या असाव्यात. 

– विद्यार्थ्यांना सम-विषम रोल नंबरनुसार विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावं.

– विद्यार्थ्यांच्या जागा बदलू नयेत. एकाच ठिकाणी बसवण्यात यावं.

– शाळा सुरू झाल्यावर 15 दिवसांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी शिक्षकांनी संवाद साधावा आणि त्यांना माहिती द्यावी.

– शाळेत प्रवेश केल्यानंतर स्क्रिनिंग, सॅनिटायझेशन सर्व प्रक्रिया करणं अत्यावश्यक आहे.

– शाळेतील सर्व गोष्टी, खाण्याचे पदार्थ विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत घेऊन यावेत. इतरांच्या वस्तू वापरू नयेत.

– शाळेत येताना प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क घालणं बंधनकारक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.