बीड

विवाह समारंभ व अंत्यविधीसाठी नियमांचे पालन करावे–जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. ९:-जिल्ह्यात इतर कोणत्याही जिल्ह्यातून, राज्यातून व्यक्ती आल्यास त्यांनी अंत्यविधी व विवाह समारंभासाठी उपस्थित राहू नये व कडकपणे 28 दिवस होम क्वारंटाईनचे नियम पाळावेत. जर अशी कोणतीही व्यक्ती या नियमाचे उल्लंघन करत असल्यास किंवा सदरील कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास संबंधित व्यक्ती व ज्यांचे मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशा व्यक्ती विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहेत.

राज्य शासन यांचे दिनांक 31 मे 2020 आदेशानुसार अंत्यविधीसाठी 10 व विवाह समारंभासाठी 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे परंतु इतर जिल्हा, राज्यांमधून व्यक्ती आल्यास त्यांनी स्वतः शासन नियमानुसार आल्यापासून 28 दिवस कडकपणे येथील परिवारासह होम क्वारंटाईन होणे अपेक्षित असते. परंतु ते असे न करता अंत्यविधी व विवाह समारंभ समारंभासाठी सामील होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित (पॉझिटिव्ह) रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आल्याने असे निर्देशीत केले आहे.
सदरील प्रतिबंधात्मक निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे सूचित केले असून
यात विवाह समारंभ पुरती वधू-वर व त्यांचे आई-वडील यांना तसेच निधन झालेल्या व्यक्तीचे सख्खे नातेवाईक यांना अंत्यविधीपुरती सूट देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी या कार्यक्रम, विधींना उपस्थित राहणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दोषी व्यक्ती आढळल्यास भारतीय दंडसहिता 1860 (45) याच्या कलम 188 अन्वये शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि इतर कलमा सह दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3)अन्वये दिनांक 30 जून रोजी रात्री 12.00 वा.पर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश या आदेशासह लागू राहतील.