महाराष्ट्र

गुड न्यूज! पुढील 24 तासात राज्यात मान्सून आगमन होणार

राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडला त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत. मात्र आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण पुढील 24 तासात राज्यात मान्सून दाखल होणार आहे. तर 11 जून रोजी त्याचा वेग आणखी वाढणार आहे. हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुपम काश्यपी यांनी ही माहिती दिली. मान्सूनच्या आगमनाची ही गुड न्यूज बळीराजाला सुखावणारी आहे.

मान्सून नेमका कधी आणि कुठे पडेल? याबाबतची सर्वांना उत्सुकता होती. मात्र राज्यामध्ये दहा तारखेला म्हणजे उद्या मान्सूनचे आगमन होईल. तसेच पुढील पाच दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 12 जून रोजी पुण्यात आणि 13 जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होईल.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे राज्यात 11 जूनपासून मान्सूनचा वेग वाढेल. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.