शरद पवार यांचा कोकण दौरा,आज रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी
रायगड : निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगडमध्ये दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी माणगाव, म्हसळा आणि दिवेआगारची पाहणी केली. यानंतर ते श्रीवर्धनची पाहणी करणार आहेत. शरद पवार दुपारी चार वाजता श्रीवर्धन इथे आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. तर निसर्ग वादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हरिहरेश्वरची पाहणी संध्याकाळी पाच वाजता करणार आहेत.
शरद पवार यानंतर दापोलीला भेट देणार असून तिथेच ते मुक्काम करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे आणि स्थानिक आमदार उपस्थित आहेत.