महाराष्ट्रबीडमराठवाडा

लाखो भाविकांच्या गर्दीने श्रीक्षेत्र नारायणगड फुलला

बीड, दि. २९ : महाराष्ट्राची धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडावर गुरुवारी (दि. २९) राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. जयहरी विठ्ठल नामाच्या गजराने गड दुमदुमून गेला.

जयहरी विठ्ठल नामाचा गजर; जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सकांची भेट

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे व जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनीही गडावर येऊन विठ्ठल – रुक्मिणी व नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. या दोघांचा गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी सत्कार केला.

श्रीक्षेत्र नारायणगडावर आषाढी एकादिशीला राज्यभरातून भाविक येत असतात.

यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज व विश्वस्तांच्या पुढाकारातून वाहतूकीसाठी वाहनतळ तसेच मार्ग निश्चिती करण्यात आली होती.

गुरुवारी पहाटे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते विठ्ठल – रुक्मिणीची पुजा झाली. त्यानंतर भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झाली. दिवसभरात लाखो भाविकांनी गडावर येऊन विठ्ठल – रुक्मिणी व नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

आरोग्याची दिंडी धाकट्या पंढरीच्या दारी

यंदा पंढरपूरच्या वारीच्या अनुषंगाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने महाआरोग्य शिबीर राबवले जात आहे. याच धर्तीवर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे व जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या संकल्पनेतून जिल्हा आरोग्य प्रशासनाची वारी धाकट्या पंढरी हा उपक्रम राबवून गडावर आरोग्य शिबीर घेण्यात आले. गडावर आलेल्या वारकऱ्यांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार देण्यात आले. तसेच, रक्तदान शिबीरालाही मोठा प्रतिसाद मिळाला. शिबीराचे उद॒घाटन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांच्या हस्ते झाले. आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे उपस्थित होते. दरम्यान, या दोघांनी विठ्ठल रुक्मिणीचे व नगद नारायण महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

मठाधिपती शिवाजी महाराज यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच, गडावरील विकास कामांची आणि भाविकांसाठीच्या सुविधांची व इतर उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर श्रीमती मुधोळ व शिवाजी महाराज यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद म्हणून रोपटे देण्यात आले.

यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला. यावेळी गडाचे विश्वस्त बी. बी. जाधव, बळीराम गवते, गोवर्धन काशिद, मस्के राजेंद्र, फॉरेस्ट ऑफीसर अशोक काकडे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.