निवडणूक आयोगात शिंदेंचा विजय, धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेला
नवी दिल्ली, 17 जानेवारी : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण ही निशाणी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला मिळाली आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. धनुष्यबाणासह शिवसेना हे नावही एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये मागचे तीन दिवस आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सुनावणी झाली. या सुनावणीवेळी शिंदेंकडून महेश जेठमलानी आणि हरीश साळवे यांनी आम्ही पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलं नाही, तर ही पक्षांतर्गत लोकशाही आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे, असा दावा केला. आता निवडणूक आयोगानेच शिवसेना हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळीही एकनाथ शिंदेंकडून हा दाखला दिला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने आम्हाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे, त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा कसा लागू होऊ शकतो, असा दावा शिंदेंच्या वकिलांकडून सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळी केला जाईल.
निवडणूक आयोगाने 78 पानांचा निकाल दिला आहे, या निकालात शिवसेनेचा इतिहासच बदलला गेला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र देण्यात आली होती, पण निवडणूक आयोगाच्या निकालात आमदार आणि खासदार कुणाकडे हाच कळीचा मुद्दा ठरला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 55 पैकी 40 आमदार आणि 13 खासदार गेले, याशिवाय प्रतिनिधीसभेतही बहुमत आपल्या बाजूने आहे, असा दावा शिंदेंकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला होता.