बीड

दुःखद बातमी! मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ थंडावली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Jan :- शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे आज रविवारी दु:खद निधन झाले. ते 102 वर्षांचे होते. गत काही दिवसांपासून औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेच्या समस्यांसाठी लढणारा लढवय्या नेता हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. केशवराव धोंडगे हे प्रदीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिलेले आहेत. त्यांनी विधानसभेबरोबरच लोकसभेतही जनतेचे प्रतिनिधीत्व केले आहे.

केशवराव धोंडगे हे ५ वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते. तसेच एक वेळा ते लोकसभेची निवडणूकही जिंकले होते. सर्वसामान्य जनतेच्या समस्या ते सभागृहात पोटतिडकीने मांडत असत. विधानसभेत त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत. ते निर्भिड आणि स्वाभिमानी बाण्याचे जनप्रतिनिधी होते. केशवराव धोंडगे यांनी आणीबाणीच्या लढ्याचेही नेतृत्व केले होते. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ते १४ महिने कारावासात होते. यातून महाराष्ट्राचा त्यांचा लढाऊ आणि स्वाभिमानी बाणा दिसला होता.

ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांनी १९८५ साली गुराखीगडाची स्थापना केली होती. इतक्यावरच न थांबता त्यांनी जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलनही भरवले होते. धोंडगे यांची लढवय्ये नेते अशीही ओळख होती. त्यांनी नवनवीन कल्पना राबवून विविध प्रकारचे सत्याग्रह केले. या सत्याग्रहांमध्ये पिंडदान सत्याग्रह, बोंबल्या सत्याग्रह, शेणचारू सत्याग्रह आणि खईस कुत्री सत्याग्रहांचा समावेश होता. त्यांनी केलेल्या सत्याग्रहांची चर्चा राज्यभरात होत असे.