खडसेंचा दावा! शिंदे- फडणवीस सरकार कधीही कोसळू शकतं…
ZunjarNeta वर क्लिक करून वॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
1 Jan :- महाराष्ट्राचं राजकारण आपण जे पाहतो आहोत त्यात आता अशा काही अनपेक्षित गोष्टी घडत आहेत की कधीही काहीही घडेल यावर आपला विश्वास बसला आहे. २०१९ ला झालेली महाविकास आघाडी. त्यानंतर अडीच वर्षांनी सरकार कोसळणं, एकनाथ शिंदे यांचं बंड, भाजपसोबत जाणं, शिवसेना दुभंगणं हे सगळंच उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. अशात आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकार कोसळू शकतं असं म्हटलं आहे.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत. अब्दुल सत्तार यांनी याविषयी उघडपणे सांगितलं आहे. अब्दुल सत्तारांनी आता हे नेमके कोण आहेत तेदेखील स्पष्ट सांगून टाकावं. त्यांच्या विरोधात जे षडयंत्र झाल्याचं म्हणत आहेत त्यांची नावं त्यांनी जाहीर करावीत. शिंदे फडणवीस सरकारवर अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार आहे. कोर्ट काय निकाल देतं त्यावर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. त्यात मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता जर वाढली तर सरकार कधीही कोसळू शकतं असा दावा एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केला आहे.
नागपूरमध्ये नुकतंच जे हिवाळी अधिवेशन पार पडलं त्यात अब्दुल सत्तार यांना टार्गेट करण्यात आलं होतं. अजित पवार, जयंत पाटील यांच्या सारख्या नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांवरून त्यांना टार्गेट केलं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच इतरही काही मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार जास्तच अडकले. त्यानंतर अधिवेशनात आपल्याला अडकवणारे आणि बदनाम करणारे आपल्याच पक्षातले आहेत असं म्हटलं होतं. हाच धागा घेऊन एकनाथ खडसे यांनी मंत्र्यांमधली अस्वस्थता वाढली तर हे सरकार कधीही कोसळू शकतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
२१ जूनला महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. ही संख्या काही दिवसातच ४० इतकी झाली. त्यानंतर २९ जूनला महाविकास आघाडी सरकार हे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे कोसळलं. त्यानंतर ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारही करण्यात आला. मात्र शिंदे गट आणि त्यांचे मंत्री सातत्याने काही ना काही वादात अडकत आहेत हे दिसून येतं आहे. मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे ती जर वाढली तर हे सरकार कधीही कोसळू शकतं असं एकनाथ खडसे यांनी आता म्हटलं आहे.