महाराष्ट्र

भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप! म्हणाले, …सत्ता यांच्या बापाची होती का?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Sept :- शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले. आम्हाला माहित आहे. आम्ही मिटींगमध्ये काही बोलल्यावर निघून जाईन म्हणायचे. सत्ता यांच्या बापाची होती का? असा सवाल विचारत शिंदे गटाचे आमदार, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि मंत्र्यांनी हिंदू गर्वगर्जना यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागात सभांचे आयोजन केले आहे. याच सभेत बोलताना भुमरे पुढे म्हणाले, सुभाष देसाई यायचा आणि हात जोडत निघून जायचा, असे म्हणत संदिपान भुमरेंनी हात जोडण्याची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.

आम्ही मिटींगमध्ये काही बोलण्याचा प्रयत्न केला तर मी मिटींगमधून जाईल, अशा धमक्या ते द्यायचे. तुमच्या बापाची सत्ता आहे का? निवडून आम्ही यायचे आणि सत्ता तुम्ही भोगायची. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, पण खऱ्या खस्ता आम्ही खाल्ल्या आहेत.

संदिपान भुमरे म्हणाले, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांना तुम्ही जलसंधारण खाते दिले. अपक्ष असतानाही त्यांना पालकमंत्री केले. त्यांच्याकडून तुम्ही किती खोके घेतले हे माहित आहे. याची जाण आम्हाला आहे. असा थेट आरोप भुमरेंनी केला आहे.

एकनाथ शिंदेंनी बंड करत शिवसेना सोडली. अगदी तेव्हापासून भुमरे त्यांच्यासोबत आहेत. नुकतीच पैठणमध्ये मोठी सभा घेत शिंदे आणि भुमरेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केले आहे. गेल्या काही दिवसात संदिपान भुमरे ठाकरेंवर वार करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आता तर त्यांनी आदित्य ठाकरेंनंतर थेट उद्धव ठाकरेंनाच निशाण्यावर धरले आहे.

4-5 दिवसांपूर्वी अमरावतीत बोलताना संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. ते म्हणाले होते, एखाद्या नवरीने माहेर सोडावे तसे रडत रडत, डोळे व नाक पुसत एखाद्या नवरी प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला. उद्धव ठाकरे आमदारांना सोडा, कॅबिनेट मंत्र्यांनाही भेटत नव्हते. गद्दार आम्ही नाही तर युतीच्या नावावर मते घेणारे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापणारे तुम्ही आहात. असाही टोला त्यांनी ठाकरेंना लगावला होता.