महाराष्ट्र

RSS बंदीवर चर्चा व्हायला हवी- सुप्रिया सुळे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Sept :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या मागणीवर चर्चा व्हायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. त्या आज सोलापूरमध्ये बोलत होत्या. केंद्र सरकारने ‘पीएफआय’वर बंद घातली. त्यानंतर अनेकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालण्याची मागणी केली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर पुढील पाच वर्षांसाठी केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात ‘पीएफआय’सोबतच रेहाब इंडिया फाउंडेशन, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम काउन्सिल, नॅशनल कन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स, एम्पावर फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्यावर बंदी घातल्याचे म्हटले आहे. त्यानंतर अनेकांनी विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने ‘पीएफआय’वर बंदी घातली आहे. या बंदीबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कोणी बंदीची मागणी केली असेल, तर त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कुठल्याही गोष्टी करताना त्यांची समाजात चर्चा व्हावी. देशात होणाऱ्या गोष्टी संविधानाच्या चौकटीत राहून कराव्यात. सर्वांना समान न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ‘पीएफआय’वरील बंदीचा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असून, त्याबद्दल केंद्र सरकारला स्पष्टीकरण विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवर संघावर बंदी घालण्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. ते माध्यमांशी बोलताना म्हणालेत की, काही लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी करतायत. मात्र, आतापर्यंत संघाने असा एक तरी प्रकार केलाय का जो पीएफआयने केलाय, असा सवाल त्यांनी केला.

भारतात कायदा, संविधान आहे. कोणताही आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात. संघावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या लोकांकडे अक्कल कमी असल्याने मी त्याच्यावर फार काही बोलणार नाही. असे मुर्खांसारखे बोलणारे लोक खूप आहेत, असे म्हणत फडणवीसांनी नाना पटोलेंना टोलाही लगावला आहे.