सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेंना दिलासा, ठाकरेंना धक्का
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
27 Sept :- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज शिंदे गटाला दिलासा मिळाला, तर उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे पक्षचिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगाच्या कोर्टातच लढली जाणार आहे.
दुसरीकडे आमदारांची अपात्रता, पक्षांतर बंदी कायदा, आदींबाबतची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ करणार आहे. तर पक्षांतर, पक्ष आणि निवडणूक चिन्हावर अधिकार ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील बंडावर झालेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आज प्रथम शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी घटनापीठापुढे बाजू मांडली. त्यानंतर शिंदे गट तसेच राज्यपालांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तत्पूर्वी ठाकरेंचा बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा हा सभागृहाचा विश्वास गमावल्याचा पुरावा असल्याची बाजू शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायालयात मांडली.
निवडणूक आयोगाकडून अॅड. अरविंद दातार यांनी बाजू मांडली. अरविंद दातार म्हणाले, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयोगाचे काम हे विधानसभा अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींचा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर परिणाम होत नाही.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षप्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू अॅड. तुषार मेहता यांनी मांडली. तुषार मेहता म्हणाले, कोणती शिवसेना खरी याचे उत्तर आयोगाला द्यायचे आहे. आयोगाला त्यांचे काम करु दिले पाहीजे. पक्ष व चिन्हाबाबत निर्णय घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाला द्यावी.