धक्कादायक! नवजात बालकांच्या ICU मध्ये आग
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 Sept :- अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या विशेष दक्षता कक्षातील (एसएनसीयू) व्हेंटिलेटरला आग लागल्यामुळे तब्बल 37 बालकांचे प्राण धोक्यात आले होते. परंतु त्याचवेळी दैनंदिन तपासणीसाठी (राऊंड) पोचलेल्या डॉक्टरांनी समयसूचकता दाखविल्यामुळे या सर्व बच्चूंचे प्राण वाचले.
दरम्यान, दक्षतेचा भाग म्हणून 25 बालकांना त्याच रुग्णालयातील इतर विभागात स्थानांतरीत केले असून इतर 12 बालकांना वेगवेगळ्या खासगी, सरकारी व निमसरकारी दवाखान्यांमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
ही घटना आज, रविवारी सकाळी 10च्या सुमारास घडली. इन्क्युबेटरमध्ये (वार्मर) ठेवण्यात आलेल्या दोन बालकांना व्हेंटिलेटरचीही गरज असल्याने त्यांच्या वार्मरला व्हेंटिलेटरही जोडले होते. यापैकी एका व्हेंटिलेटरमध्ये ‘शॉक सर्कीट’ झाल्याने त्या व्हेंटिलेटरने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता तेथे कार्यरत परिचारिका सलमा यांनी व्हेंटिलेटरपासून वॉर्मर वेगळे केले आणि वार्डातील अग्निशमन यंत्राचा आधार घेत ती आग तत्काळ विझविली. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वॉर्डात धूर साचल्याने गुदमरल्यासारखे होत होते.
आग लागल्यानंतर लगेच वीज प्रवाह खंडित झाल्याने धूर इतरत्र पसरला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी दैनंदिन तपासणीचे काम बाजूला सारुन लगेच बच्चूंना बाहेर काढण्याची मोहिम हाती घेतली. ज्यांचे बाळ एसएनसीयूमध्ये आहे, त्यांच्या मातांना लगेच तेथे बोलावून त्यांच्यासह बाळांना इतरत्र हलविले. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या वाठोडकर यांनी सूत्रे हाती घेत सर्व बाळांना त्यांच्या मातांसह सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे कार्य पार पाडले.
घटनेची माहिती कळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (भारत जोडो यात्रेनिमित्त ते अमरावतीत होते) यांच्यासह तिन्ही माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख व प्रवीण पोटे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. रुग्ण महिला, त्यांचे नातेवाईक यांच्यासह त्यांनी कर्तव्यरत वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन घटनेचे मूळ कारण जाणून घेतले. त्याचवेळी सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले. खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा, आमदार बळवंतराव वानखडे, काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व बबलू शेखावत यांनीही घटनास्थळाला भेट देत योग्य त्या सूचना केल्या.