महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर सुपुत्र श्रीकांत शिंदे बसल्याने मोठा वाद; शिंदे गटाने आरोप फेटाळला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Sept :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे छायात्रित्र व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्विटवर हा फोटो अपलोड केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसलेले दिसत आहेत. मात्र, मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हा आरोप फेटाळला आहे.

या फोटोवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत वरपे यांनी म्हटले आहे की, खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी या फोटोवरुन मुख्यमंत्री शिंदेवर टीकास्त्र सोडले आहे. मिंधे गटाचे खरे मुख्यमंत्री कोण?, असा सवाल त्यांनी केला. रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांकडून कोणी माईक हिसकावून घेतेय. तर, कोणी यांची खुर्ची हिसकावतय. बाप मुख्यमंत्री आहे म्हणून मुख्यमंत्रीचा खुर्चीवर जाऊन बसने म्हणजे याला हावरे पणाची घराणेशाही बोलतात. निदान त्या खुर्चीचा तरी योग्य सन्मान करावा.

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप फेटाळला आहे. म्हस्के म्हणाले की, राष्ट्रवादीकडून व्हायरल करण्यात आलेला फोटो हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरामधील आहे. श्रीकांत शिंदे स्वतःच्या घरात बसले आहेत. व्हायरल होत असलेला फोटो मंत्रालयाच्या किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयाचा नाही. फोटोमध्ये ‘महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री’ असा एक बोर्ड दिसत आहे. जेव्हा मुख्यमंत्री घरच्या कार्यालयातून व्हीसी जॉईन करतात तेव्हा तो बोर्ड त्यांच्या मागे दाखवण्यासाठी वापरला जातो. खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान आहेत. राष्ट्रवादीचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे.