बीड

नगर-आष्टी रेल्वे मार्गाचे उद्घाटन! मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन हजेरी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Sept :- अहमदनगर ते आष्टी या 65 किलोमीटर अंतरावरील रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. त्यामुळे बीड तसेच नगर जिल्ह्यातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. आज लोकापर्ण सोहळ्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मार्च 2023 पर्यंत या रेल्वे मार्गाचे बीडपर्यंतचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा केली.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण झाले, अशा भावना व्यक्त केल्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, ही रेल्वे जेव्हा जेव्हा धडधडेल, तेव्हा तेव्हा बीडकरांच्या मनात गोपीनाथ मुंडेंची आठवण ताजी होणार आहे. या मार्गाच्या प्रत्येक रुळासाठी गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

लोकापर्ण सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील उपस्थित आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हजेरी लावली आहे.

परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज प्रथमच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावली. आष्टी तालुक्यातील नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा व आष्टी या सहा स्टेशनवर तिकीट विक्री सुरू केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

अहमदनगर-आष्टी रेल्वेमार्गावर एकूण सहा थांबे असून रेल्वे प्रवाशांसाठी 40 रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे. रविवार वगळता दररोज ही गाडी धावणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा बनलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर असून नगरपासून आष्टीपर्यंत 65 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे.

लोकार्पण सोहळ्यात पंकजा मुंडे म्हणाल्या, या रेल्वे मार्गाचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते. लोकसभा निवडणुकीवेळी बीडमध्ये असताना त्यांनी या रेल्वेमार्गासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मोदींनी ते आश्वासन पाळले. या रेल्वेमार्गामुळे रेल्वेला कोणताही फायदा होणार नाही. मात्र, बीड जिल्ह्यातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. तसेच, आज कार्यक्रमाला आले नसते तर माध्यमांनी बातम्या लावल्या असत्या. त्यामुळे मुद्दाम आले, असा टोलाही मुंडेंनी लगावला. पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, या मार्गाला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी करावी, असे काहींचे माझ्याकडे म्हणणे होते. मात्र, मी तसे करणार नाही. गोपीनाथ मुंडेंच्या नावाला हे शोभणारे नाही. तसे माझे संस्कार नाही. रावसाहेब दानवे म्हणाले, आज बीडकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. याप्रसंगी गोपीनाथ मुंडे साहेबांना कधीही विसरु शकत नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मार्च 2023 पर्यंत ही रेल्वे बीडपर्यंत धावेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, नगर-अष्टी रेल्वे मार्गासाठी 2 हजार कोटींचा निधी केंद्राने दिला. 1175 काेटींचा निधी भाजपचा मुख्यमंत्री असताना देण्यात आला. दर 3 महिन्यांनी मी स्वत: लक्ष घालत होतो. मविआ सरकारने अनेक वेळा प्रकल्पांना काही महत्त्व दिले नाही. अनेकदा मविआ सरकारने निधी देण्यास नकार दिला. शिंदेंसोबत आलेल्या सरकारने मात्र आल्या आल्या कामाला सुरूवात केली. तसेच, समुद्रात जाणारे पाणी आम्ही मराठवाड्यात वळवणार आहोत. मराठवाड्यात रेल्वे कोचची निर्मिती व्हावी, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत, असे फडणवीस म्हणाले.