महाराष्ट्र

धक्कादायक! स्टेट बँकेत 4 हजार कर्मचाऱ्यांनी केला 7 हजार कोटींचा घोटाळा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Sept :- सर्वसामान्यांचा एखादा हप्ता थकला तरी त्यांच्या पोटात गोळा येतो. बँकेचे लोक घरी तर येणार नाही या चिंतेने सामान्य माणूस बेजार होतो. बँकही त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करते. मात्र, दुसरीकडे गेल्या 7 वर्षात बँक घोटाळे किंवा फसवणुकीतून देशाचे झालेले नुकसान पाहिले तर आपले काही हजार रुपये त्यापुढे किती आहेत याचा विचार सर्वसामान्य व्यक्ती करत बसेल. कारण देशात दररोज 100 कोटी रुपयांचे नुकसान बँक घोटाळ्यातून झाल्याचे समोर आले आहे. मात्र, एकूण नुकसानीचे प्रमाणही वर्षानुवर्षे कमी होत आहे. माहिती अधिकारातून बँक घोटाळ्याची माहिती उघड झाली आहे.

सर्वाधिक बँक घोटाळे किंवा फसवणुकीच्या घटना महाराष्ट्रात झाल्या आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईचाही यात समावेश आहे. बँक घोटाळा किंवा फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी सुमारे 50 टक्के घोटाळे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो.

2021-22 या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारत भरातील शाखांमध्ये 4 हजार 192 कर्मचाऱ्यांनी 7 हजार कोटींचे घोटाळे केल्याची माहिती आरटीआय अंतर्गत देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती. या घोटाळ्यात 121 कर्मचाऱ्यांनी 226 कोटींचे घोटाळे केल्याचे समोर आले आहे.

या शिवाय वेगवेगळ्या कारणांनी स्वेच्छानिवृत्ती घेणारे, राजीनामा, बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 2017-18 मध्ये एकूण 4443, 2018-19 मध्ये 1754, 2019-20 मध्ये 1330, 2020-21 मध्ये 916 आणि 2021-22 मध्ये 1277 अशा एकूण 9720 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. 1214 जणांना वेगवेगळ्या कारणांनी बडतर्फ करण्यात आले. 2017-18 मध्ये एकूण 2332, 2018-19 मध्ये 1577, 2019-20 मध्ये 2450, 2020-21 मध्ये 2059 आणि 2021-22 मध्ये 2386 अशा एकूण 10,804 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. 2017-18 मध्ये एकूण 11,524, 2018-19 मध्ये 11,647, 2019-20 मध्ये 11,525, 2020-21 मध्ये 10,851 आणि 2021-22 मध्ये 1547 असे एकूण 47,121 कर्मचारी निवृत्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

बँकेत व्यवहार न झाल्यामुळे, वारसदार मृत झाल्याचे न कळवणे आदी अनेक कारणांमुळे अनक्लेम रक्कम पडून राहाते. संपूर्ण देशात बँकेची एकूण 12 लाख 90 हजार 838 खाती असून त्यात 893 कोटी 35 लाखांची रक्कम विना दावा पडून असल्याची माहितीही देण्यात आली आहे. देशभरात स्टेट बँकेची एकूण 65 हजार 690 एटीएम आहेत. मात्र त्यापैकी किती बंद करण्यात आली याची माहिती बँकेने संकलीत केलेली नाही. बँकेत एकूण 3934 सुरक्षा रक्षकांच्या जागा रिक्त आहे.