महाराष्ट्र

दसरा मेळाव्याआधी ठाकरेंची तोफ धडाडणार! शिवसेनेचा आज संध्या. 7 वा जाहीर मेळावा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Sept :- दसरा मेळाव्याआधी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ मुंबईत धडाडणार आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी गटाप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता नेस्को मैदानात ठाकरे भाषण करणार आहेत.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर मैदानावर झालेल्या घडामोडीवर तसेच शिंदे गटाच्या टीकेवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

शिवसेनेच्या सर्वात मोठ्या बंडानंतर शिवसेनेचा हा सर्वात पहिला जाहीर मेळावा होत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थकांवर ठाकरे काय बोलणार? त्यासोबतच अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात दिलेल्या आव्हानावर काय भाष्य करणार? यासोबतच शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या मुद्दावर ठाकरे कोणाचा समाचार घेणार हे आज पाहावे लागणार आहे.

शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात फिरून शिंदे गटावर हल्ला चढवत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे अद्याप म्हणावे तसे लढाईत उतरले नसल्याचे दिसत होते. त्यामुळे आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकणार का, हे पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
काय आदेश देणार?

अलीकडेच रामदास कदम यांनी तर वैयक्तिक पातळीवर ठाकरे कुटुंबियांवर अत्यंत बोचरी अशी टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या भाषणात या सगळ्याचा कशाप्रकारे समाचार घेणार, हे पाहावे लागेल. दसरा मेळाव्यासाठी पालिकेने परवानगी नाकारल्यास पुढील रणनीती काय असेल, याबाबत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देतात, हेदेखील पाहावे लागेल.

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज संध्याकाळी सात वाजता हा मेळावा होणार आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसैनिकांना जाहीर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी केलेले आरोप उद्धव ठाकरे कशाप्रकारे परतावून लावतात, हे पाहावे लागेल. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये शिवसेनेला गळती लागली आहे. परिणामी उद्धव ठाकरेंसोबत असलेले शिवसैनिक काहीसे धास्तावले आहेत, चिंतेत आहेत. त्यामुळे आजच्या भाषणातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुंकणार का, हे पाहावे लागेल.