महाराष्ट्र

जायकवाडी ओव्हर फ्लो! राज्यात पावसाचा प्रवास सुरु

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 Sept :- मान्सून परतीचा प्रवास सुरू झाला असून, राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या काही दिवसात देशभरात पावसाने थैमान घातले होते. अनेक भागात पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती. मात्र, सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे, मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. तर पहाटेपासून पुण्यासह परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत.

हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबादसह परिसरात पावसाने हजेरी लावली. तर कालपासून औरंगाबादसह, जालना, परभणी, बीड या भागात पावसाचा जोर ओसरला आहे. काल संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नव्हते. मात्र, आज सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले आहे. दरम्यान, आज विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सोलापूरमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

21 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर काही प्रमाणात कमी राहणार आहे. भारताच्या वायव्य भागात पश्चिम राजस्थानातील श्रीगंगानगर, बिकानेर, जोधपूर, जैसलमेर, बारमेर, झालोर यासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, सौराष्ट्रातील कच्छचे रण या भागात वातावरणात बदल झाला आहे.

जमिनीलगत उच्च दाब तयार झाला असून त्यातून घड्याळ काट्याच्या दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. 21 सप्टेंबरपर्यंत कधीही या भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

मराठवाड्यात यावर्षी समाधानकारक म्हणजेच 730 मिमी पाऊस झाला. 873 प्रकल्पांत 84 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे 749 प्रकल्पांत अजूनही 69 टक्के इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हाच साठा 73 टक्क्यांवर होता. प्रकल्पीय क्षमता 8214 दलघमी असताना 6967 दलघमी साठा झाला. लघु प्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

जायकवाडी धरण 31 वर्षांनंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात भरले. रविवारी धरणाचे 27 दरवाजे उघडून त्यातून विसर्ग सुरू होता. यंदा 11 मोठ्या प्रकल्पात 93 टक्के साठा झाला आहे. तो गतवर्षी 84 टक्के होता. मांजरा प्रकल्पात सर्वात कमी 87 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण साठा 133 दलघमी आहे. हे प्रमाण 49 टक्के आहे. तर माजलगाव प्रकल्पात 244 दलघमी पाणीसाठा झाला असून हे प्रमाण 78 टक्के आहे.