फडणवीसांसमोर बेरोजगार तरुणांचा राडा; पोलिसांनी तरुणांना घेतले ताब्यात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 Sept :- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील लाखो तरुणांची रोजगाराची संधी हिरावली गेली. दुसरीकडे, राज्यातील विविध विभागातील नोकर भरती रखडल्याने तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे. या रोषाचा सामना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त फडणवीस आज नांदेडमध्ये असताना एका कार्यक्रमादरम्यान तरुणांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी केली. ‘पोलिस भरती झालीच पाहीजे’, अशा घोषणा तरुणांनी दिल्या. पोलिस भरतीवरुन तरुण आक्रमक झाल्याने पोलिसांनी तातडीन घटनास्थळी धाव घेतली. या आंदोलनात शेकडो तरुण सहभागी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठिमार करावा लागला. तसेच, काही तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. या कार्यक्रमानंतर फडणवीस सभागृहाबाहेर येत असतानाच तरुणांनी फडणवीसांना घेराव घालण्याचा प्रयत्न करत ही घोषणाबाजी केली. त्यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी लाठीमार करत तसेच, काही जणांना ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
घटनेनंतर आंदोलक तरुणांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आंदोलक म्हणाले, पोलिस भरतीची प्रक्रिया काही वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे तरुणांसमोर रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने तात्काळ ही भरती करावी. दरम्यान, तरुणांच्या आक्रमक आंदोलनावर देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. यावर आंदोलक म्हणाले, आजच्या आंदोलनानंतर तरी राज्य सरकार पोलिस भरतीबाबत काही निर्णय घेते का?, हे पाहावे लागेल. अन्यथा याहून आक्रमक आंदोलन करावे लागेल.