महाराष्ट्र

स्वातंत्र्य सैनिकांचा, मराठवाड्यातील जनतेचा अपमान; शिंदे-फडणवीसांवर खैरेंची टीका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 Sept :- या मुख्यमंत्र्यांना काय झाले कोण जाणे? पहिल्यांदा झेंडावंदनाची 9 ची वेळ बदलली. फडणवीस म्हणाले ते तिकडे मजा मारायला गेले नव्हते. तर मी म्हणतो, फडणवीसजी तुम्ही इकडे यायचे होते. स्वातंत्र्य सैनिकांचा, मराठवाड्यातील जनतेचा हा अपमान करण्यात आला, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

चंद्रकांत खैरे म्हणाले, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास पाहिल्यावर लक्षात येते की, निझामशाहीतील रजाकारांनी आपल्याला प्रचंड त्रास दिला होता. लुटालुटीमुळे, अराजकतेमुळे लोक त्रस्त झाले होते. वल्लभभाई पटेल, गोविंदभाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेल्या चळवळीमुळे आपल्याला 17 सप्टेंबर 1948 ला स्वातंत्र्य मिळाले.

खैरेंनी मुक्तीसंग्रामाच्या स्तंभाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, आमचे सरकार असताना बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी आमचे शिवसेनेचे सरकार असताना एक ठराव संमत केला. साहेब म्हणाले होते, याठिकाणी झेंडावंदन झाले पाहिजे, मुक्तिसंग्रामाची आठवण राहिली पाहिजे. दिवाकर रावतेंनी ठराव मांडला, कॅबिनेटमध्ये तो ठेवण्यात आला. मनोहर जोशी त्यावेळी मुख्यमंत्री होते. मुंडे साहेबही त्यावेळी होते. आणि अशाप्रकारे स्तंभ उभारण्यासाठी, शहिदांच्या या भव्य स्मारकासाठी ठराव संमत होऊन पुढे स्तंभ उभारण्यात आले.

चंद्रकांत खैरे म्हणाले, झेंडावंदन करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असते. ती परवानगी केंद्राकडून घेण्यात आली. त्यावेळी ठरल्यानुसार साडेआठ वाजता याठिकाणी यायचे, स्तंभाचे पूजन करायचे. पोलिसांची सलामी होईल. सलामीनंतर मान्यवरांकडून बरोबर 9 वाजता झेंडावंदन करायचे. अशी पद्धत होती. ही वेळ मागील वर्षीपर्यंत पाळण्यात आली होती. मात्र आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ही वेळ बदलण्यात आली.

चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘या मुख्यमंत्र्यांना काय झाले कोण जाणे? पहिल्यांदा ही वेळ बदलली गेली. मुख्यमंत्र्यांना हैदराबादला जायचे होते. फडणवीस म्हणताय, ते काय तिकडे मजा मारायला गेले नव्हते. तर मी म्हणतो, फडणवीसजी तुम्ही इकडे यायचे होते. काही स्वातंत्र्य सैनिक आज याठिकाणी पोहोचले त्यावेळी कार्यक्रम संपलेला होता. मुख्यमंत्री गेलेले होते.

पुढे ते म्हणाले, माझ्या मते हा स्वातंत्र्य सैनिकांचा, मराठवाड्यातील जनतेचा अपमान आहे. जो मुख्यमंत्र्यांनी केला. 9 वाजता झेंडावंदन हा नियम आहे. त्यामुळे तुम्ही येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवायला हवे होते. आणि मुख्यमंत्र्यांनी मग खुशाल हैदराबादला जायचे होते. कोणतेही नियोजन केलेले नाही. कार्यक्रमाला गर्दी नव्हती. त्यामुळे शिवसेनेने बरोबर 9 वाजता मानवंदना दिली.

खैरेंनी आमदार शिरसाटांची यावेळी खिल्ली उडवली. ते म्हणाले, संजय शिरसाटला काय माहिती आहे, त्याला म्हणा मग तू करायचे होते झेंडावंदन. तुझ्यात ताकद होती तर. संजय शिरसाटला म्हणा आभाळ कोसळले नाही. मात्र, इकडे मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्र्यांनी यायला हवे होते. संकेत पाळण्यात आलेला नाही.