महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंचा हैदराबाद दौरा वादाच्या भोवऱ्यात; विरोधकांनी उडवली टीकेची झोड

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 Sept :- मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घाईघाईत उरकलेले झेंडावंदन आणि त्यानंतर हैदराबाद येथील कार्यक्रमाला लावलेली हजेरी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दिल्लीच्या मागे धावणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा झाली, तर ती कोणालाही आवडणार नाही, अशी टीका राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांनी केली. तर मुख्यमंत्री हैदराबादला जाणे यात टीका करण्यासारख काय आहे, अशी प्रतिक्रिया श्रीकांत उमरीकर यांनी दिली.

औरंगाबादमधील हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा कार्यक्रम सकाळी 6.50 ला उरकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हैदराबाद येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे विरोधी पक्षांनी टीकेची झोड उडवली आहे. यावर राजकीय विश्लेषकांना बोलते केले असता, त्यांनी शिंदे समर्थन आणि विरोधही केला.

हैदराबादमध्ये पहिल्यांदाच मुक्तिसंग्रामाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यासाठी औरंगाबादमध्ये सकाळी 9 वाजता होणाऱ्या मुक्तिसंग्रामाच्या झेंडावंदनाची वेळ बदलण्यात आली. यावरून शिवसेनेने शिंदेंना लक्ष्य केले आहे.

वादावर राजकीय विश्लेषक जयदेव डोळे म्हणाले, हा मुक्तिसंग्राम 3 राज्यांचा होता. मराठवाड्यातले 5 जिल्हे, कर्नाटकचे 3 आणि तेलंगणातील 9 जिल्ह्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी इथेच राहायला हवे होते. तिकडे तेलंगणा, कर्नाटकचे मुख्यमंत्री होतेच. मात्र पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी सांगड घालता यायला हवी यासाठी वेळ बदलली. हा काही नियमभंग किंवा कायदेभंग नाही. मात्र, संकेताचा भंग आहे. त्यांनी तो करायला नको होता. पंतप्रधानांनी त्यांना बोलावले असेल तर तो भाग वेगळा आहे.

डोळे पुढे म्हणाले की, ऐनवेळी वेळा बदलून तातडीने दुसऱ्या राज्यात जाणे गरजेचे होते का. राजकीय चर्चा कधीही करता आली असती. त्यासाठी झेंडावंदनाची वेळ बदलून संकेतभंग केला. मराठवाड्यतील लोकांचा अपमान केला. स्वतःच्या पदाची अप्रतिष्ठा करून घेतली.

राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे हैदराबादला जाणे ही चांगली गोष्ट आहे. यावर टीका करण्यासारख काय आहे? 17 सप्टेंबरचे झेंडावंदन हैदराबादला होत नव्हते. ते पहिल्यांदा झाले. इथले झेंडावंदन करून जर ते तिकडे गेले असतील तर त्यात चुकीचे काय. शिवसेनेची टीका अनाठायी आहे.

उमरीकर पुढे म्हणाले की, खरी टीका यावर व्हायला हवी की, अजूनही स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा क्रांती चौकात शिवसेना बसवणार होती. तो चौथरा अजून रिकामा आहे. टीका यावरही व्हायला हवी. मराठवाड्याचे प्रश्न जे प्रलंबित आहेत, त्यावर चर्चा, टीका व्हायला हवी. ते प्रश्न मार्गी लावायला हवे. हे तर नवीन सरकार आहे. त्यांना 100 दिवस झाल्यावर टीका करता येऊ शकते. त्यामुळे आत्ता टीका करणे अनाठायी आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी या वादावर मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, या मुख्यमंत्र्यांना काय झाले कोण जाणे? पहिल्यांदा झेंडावंदनाची 9 ची वेळ बदलली गेली. फडणवीस म्हणाले ते तिकडे मजा मारायला गेले नव्हते. तर मी म्हणतो, फडणवीसजी तुम्ही इकडे यायचे होते. स्वातंत्र्य सैनिकांचा, मराठवाड्यातील जनतेचा हा अपमान करण्यात आला.