महाराष्ट्र

इयत्ता 5 वी पासून कृषी अभ्यासक्रम; अब्दुल सत्तारांची घोषणा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 Sept :- महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती हा विषय शिकवला जाणार आहे. अशी घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्याचवेळी ही नवी घोषणा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात खडाजंगी झालेली नाही. ते आपल्याला हसतहसत याविषयी बोलले असे म्हणत सत्तारांनी झापाझापी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

अब्दुल सत्तार पुडे बोलताना म्हणाले, लहानपणापासून विद्यार्थ्यांना शेतीचे ट्रेनिंग मिळावे, जेणेकरुन पुढे जाऊन रोजगार मिळाला नाहीतर विद्यार्थी शेती करु शकतील. वडिलोपार्जित व्यवसाय ते करु शकतील. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती हा विषय शिकवला जाणार आहे. पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषयाचा समावेश असेल. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत माहिती दिली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, यासाठी शिक्षकांना विशेष ट्रेनिंग देण्यात येईल. यामध्ये मुलतः शेतात फवारणी कशी करायची, सरी कशी टाकायची, पेरणी कशी करायची, गायी म्हशींची निगा कशी राखायची, नवीन अवजारांचा वापर कसा करावा, खतांचा वापर याबाबत अभ्यासक्रम असेल. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील सर्व काही ठरवले जाईल. शिक्षणमंत्र्यांशी बोलणे केले जाणार आहे. याचा ढाचा ठरवला जाईल. मगच काय ते ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले.

घोषणा करताना अगोदर आमच्याशी चर्चा करा, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना देत त्यांचे चांगलेच कान टोचले. यावरुन आता सत्तारांनी ताकही फुंकुन प्यायचे ठरवले आहे. ते म्हणाले, मी हा निर्णय जाहिर केलेला नाही. मी मागणी करत आहे. कल्पना चांगली असेल तर ते स्विकारतील.

मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले, त्यादिवशी काय झाले होते. याबाबत अब्दुल सत्तार यांनी सविस्तर सांगितले. ते म्हणाले, खडाजंगी झाली नाही. असेच हसता-हसता मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. धोरणात्मक निर्णय थेट जाहीर करु नका. माध्यमांनी याला वेगळ्याच प्रकारे दाखवले. त्यांची बोलण्याची पद्धत, माझी बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मी रफटफ बोलतो, ते अगदी चौकटीत बसणारे बोलतात. ते वेल एज्युकेटेड आहेत, अॅडव्होकेट आहेत. त्यांच्या बोलण्याचा उद्देश असा होता की मार्चच्या बजेटमध्ये याची तरतूद करु.