सिनेमा,मनोरंजन

सैराटमधील प्रिन्स पोलिसांच्या रडारवर; बनावट शिक्के बनवल्याची माहिती

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 Sept :- मंत्रालयात नोकरीला लावून देतो, अशी बतावणी करून एका तरुणाची फसवणूक करणाऱ्या ठकसेनाच्या टोळीतील तिघांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी महेश बाळकृष्ण वाघडकर याच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय अरुण शिरसागर (वय ३१ रा. दत्तनगर, मालेगाव बसस्थानक), ओंकार नंदकुमार तरटे (संगमनेर), आकाश विष्णू शिंदे (रा. संगमनेर) यांना ताब्यात घेतले. दरम्यान, सैराट चित्रपटामधील आर्चीच्या भावाची भूमिका साकारणारा प्रिन्स ऊर्फ सूरज पवारचा मंत्रालयातील बनावट शिक्के बनवण्यात सहभाग असल्याचे पोलिस चौकशीत आरोपीने सांगितल्याने खळबळ उडाली.

तीन आरोपींना गुरुवारी राहुरी न्यायालयात उभे केले असता १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ९ सप्टेंबरला राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात ही घटना घडली. या घटनेत नेवासे तालुक्यातील भेंडा बुद्रूक येथील महेश बाळकृष्ण वाघडकर (वय २५) याची फसवणूक झाली. फसवणूक करणाऱ्या टोळीने मुंबई मंत्रालयाच्या सामाजिक न्याय विभागात कक्ष अधिकारी म्हणून नोकरीस असल्याचे सांगून महेश वाघडकर याचा विश्वास संपादन केला. रिक्त जागेवर तुझे नोकरीचे काम करतो, यासाठी पाच लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. या टोळीने वाघडकरकडून सुरुवातीला दोन लाख रुपये घेतले.

नियुक्तीपत्र आल्यानंतर तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर तुझी नोकरीची आर्डर आली असून राहुरी कृषी विद्यापीठ परिसरातील गेस्टहाऊस येथे उर्वरित ३ लाख रुपये घेऊन येण्याचे भामट्यांनी सांगितले. दरम्यान, महेश वाघडकर याला संशय आल्याने त्याने राहुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, पाखरे, पोलिस शिपाई गणेश लिपणे, शशिकांत वाघमारे यांच्या पथकाने विद्यापीठाच्या गेस्टहाऊस परिसरात सापळा लावून सुरुवातीला दत्तात्रय अरुण शिरसागर, नंतर पसार आरोपी आकाश विष्णू शिंदे याला ताब्यात घेतले. आकाशच्या सांगण्यावरून मंत्रालयाचे बनावट शिक्के तयार करणारा संगमनेर येथील ओमकार नंदकुमार तरटे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिस पथकाने तरटेकडे चौकशी केली असता मंत्रालयाचे बनावट शिक्के बनवण्यासाठी सैराट चित्रपटातील प्रिन्स म्हणजे सूरज पवार हा आला होता, अशी माहिती दिली. पवार याने सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्याशी बोलणे करून देतो, असे सांगून एका व्यक्तीला फोन लावून बोलणे करून दिले. ती व्यक्ती मी नागराज मंजुळे बोलत असल्याचे सांगून शिक्के बनवून द्या, असे त्या व्यक्तीने सांगितल्याची माहिती आरोपींनी दिली.

सैराटमधील आर्चीचा भाऊ म्हणून भूमिका साकारणारा प्रिन्स ऊर्फ सूरज पवार राहुरी पोलिसांच्या रडारवर आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. नोकरभरतीबाबत शासनाचे बनावट आदेश बनवून या टोळीतील आरोपींनी शासनासह संबंधित तरुणाची फसवणूक केली, असे सांगितले.