क्रीडा

रॉबिन उथप्पाचा क्रिकेटला रामराम…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 Sept :- भारतीय संघाचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्याने ही माहिती दिली आहे. उथप्पाने 15 एप्रिल 2006 रोजी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इंदूरमधील पदार्पणाच्या सामन्यात रॉबिनने सलामी करताना 86 धावांची खेळी केली. टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला होता.

उथप्पाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 14 जुलै 2015 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. त्याच वेळी, तो आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. आता तो आयपीएलमध्येही खेळणार नाही. रॉबिन उथप्पाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी 20 वर्षांपासून प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहे. मला भारत आणि माझे राज्य कर्नाटकसाठी खेळण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. माझा प्रवास खूप सुंदर होता. काही चढ-उतारही आले, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट असतो. त्यामुळेच मी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

उथप्पाने पुढे लिहिले की, ‘मी मुंबई इंडियन्स, आरसीबी, पुणे आणि राजस्थानचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली. तसेच कोलकाता आणि चेन्नईचा संघ माझ्यासाठी खूप खास आहे. ज्याने आयपीएल दरम्यान माझ्या कुटुंबाची खूप काळजी घेतली.’

उथप्पा 2007 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हा विश्वचषक जिंकला. रॉबिनने पाकिस्तानविरुद्ध टाय सामन्यानंतर जेव्हा बॉल-आउट झाले होते, तेव्हा त्याने सेहवाग आणि हरभजनसोबत थ्रो केला. त्यामुळे टीम इंडियाला विजय मिळाला होता.

उथप्पाने भारतासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 6 अर्धशतकांच्या बळावर एकदिवसीय सामन्यात 934 धावा केल्या. तर T20 मध्ये त्याने 1 अर्धशतकासह 249 धावा केल्या होत्या. याशिवाय उथप्पाने आयपीएलमध्ये 205 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 27.51 च्या सरासरीने आणि 130.55 च्या स्ट्राईक रेटने 4952 धावा केल्या. त्याने आयपीएलमध्ये 27 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 88 धावा आहे.