वेदांता-फॉक्सकॉनवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; ‘मविआ’ सरकारवर फोडले खापर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
14 Sept :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून ‘मविआ’ सरकारवर खापर फोडले आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ‘मविआ’वर टीका केली. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण आता तापताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीतील नेतेमंडळी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
मुंबईत दसरा मेळाव्यासंदर्भात काल एक महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, “आम्हाला तर दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता कंपनीच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली होती. सरकार त्यांना प्रकल्पासाठी जी काही मदत हवी ती देईल, असे बोलणे झाले होते. त्यानंतर तळेगावमध्ये जवळपास अकराशे एकर जमीनदेखील आम्ही देऊ केली होती. पण गेल्या दोन वर्षांत वेदांता कंपनीला ज्याप्रकारे रिस्पॉन्स मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा. आता याबाबत केंद्र सरकार आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करणार आहेत. तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करू.”
कंपनी गुजरातमध्ये गेल्याने राज्यातील विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. “हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही अनेक बैठका घेतल्या. मात्र, या सरकारचा विकासाचा इरादा नसल्यामुळे वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे.” अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी असेही ते म्हणाले.
1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या प्लांटमधून महाराष्ट्रातील थेट एक लाख कुशल तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या. वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर आता राज्यात आणि राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रीया उमटत आहेत. यावर राज ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.