महाराष्ट्र

काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 Sept :- गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व आमदारांनी विधानसभेत पोहोचून वेगळे होत असल्याचे पत्र सभापती रमेश तावडकर यांना दिले. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनवडे यांनी सांगितले की, सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो, डेलिया लोबो, केदार नाईक, राजेश फलदेसाई, अलेक्सो स्कायरिया, संकल्प अमोलकर आणि रोडॉल्फो फर्नांडीस यांची नावे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये आहेत. बंडखोर आमदारांची संख्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त असल्याने या आमदारांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही.

10 मार्च 2022 रोजी गोव्याचे निवडणूक निकाल आले, ज्यामध्ये काँग्रेसला 40 पैकी 11 जागा मिळाल्या, पण 7 महिन्यांतच पक्ष फुटला. त्यामागे काँग्रेसच्या 3 मोठ्या चुका आहेत. बाहेरून आलेल्या लोबोंसाठी पायघड्या – निवडणूक निकालानंतर काँग्रेसने बाहेरून आलेल्या मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेते केले. लोबो यांनी निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयाला विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत असलेले दिगंबर कामत यांनी विरोध केला होता. तेव्हापासून काँग्रेसमध्ये फूट पडेल, असे मानले जात होते.

अध्यक्षांवर कारवाई, प्रभारींवर नाही – गोव्यातील पराभवानंतर काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा घेतला, पण प्रदेश प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. निवडणुकीपूर्वीच पक्षातील अनेक ज्येष्ठ गुंडूरावांवर नाराज होते. त्यामुळे पक्षाने पी. चिदंबरम यांना काँग्रेसचे निरीक्षक म्हणून पाठवले होते.

नव्या अध्यक्षांवरून दुफळी झाली तरी कारवाई नाही- नूतन अध्यक्ष अमित पाटकर यांच्याबाबतही पक्षातील गटबाजी तीव्र झाली, त्याचा परिणाम अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून आला. त्यावेळी पक्षाच्या सुमारे चार आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. यावरही काँग्रेसने डॅमेज कंट्रोलच्या उपाययोजना केल्या नाहीत.

या वर्षी जुलैमध्ये काँग्रेसने दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्यावर पक्षविरोधी कारस्थानाचा आरोप करत कारवाई केली होती. त्यावेळी काँग्रेसने आपले 5 आमदार फुटू नये म्हणून चेन्नईला हलवले होते. यापूर्वी 2019 मध्ये काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचाही सहभाग होता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या सर्व बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये समावेश केला होता.