महाराष्ट्र

स्वतःसाठी खोके, महाराष्ट्राला धोके! प्रकल्प राज्याबाहेर का गेला? आदित्य ठाकरेंचा सवाल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 Sept :- वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये गेला आहे. जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी सांगावे की, हा प्रकल्प शेवटच्या क्षणी महाराष्ट्राच्या हातून का गेला? स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, असे यांचे झालेय. अशी टीका माजी मंत्री युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. आदित्य ठाकरेंनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या प्लांटमधून महाराष्ट्रातील थेट एक लाख कुशल तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या. यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आदित्य म्हणाले, सदर कंपनीला आणि राज्याला शुभेच्छा. मात्र, प्रकल्प राज्याबाहेर का गेला याचे उत्तर मिळायलाच हवे. यावर राजकारण करू नका. जी कंपनी आपल्याकडे 100 टक्के येणार होती. ती का गेली हे आम्ही विचारणार. 1 लाख लोकांना रोजगार मिळणार होता. त्यामुळे याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर राजकारण म्हणा पण आम्ही प्रश्न विचारणार.

आदित्य पुढे म्हणाले, आपल्याकडे आता जी व्यवस्था आहे, तिच्यावर आता कोणाला विश्वास नसेल. महाविकास आघाडीचे सरकार असताना कंपनी येणार होती मग आता का नाही. आत्ताच्या सरकारने आपण काय कमी पडलो याचे उत्तर द्यावे. महाराष्ट्राला यातून मोठा फटका बसलाय. याचे दुःख होत आहे. थोडे राजकारण बाजूला ठेवून इकडेही पाहा.

आदित्य ठाकरे म्हणाले की, एवढ्या मोठ्या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष का केले? हा विषय महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा आहे. सगळे ठरले होते. त्यानंतर आत्ताचे हे खोके सरकार काय करत होते? असा प्रश्न उपस्थित होतो. कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झालाय. या सरकारवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्याचमुळे आज ही परिस्थिती उद्भवल्याची टीका त्यांनी केली.

माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले, वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली होती. गोष्टी पुढे गेल्या होत्या. त्यानंतर 3 महिन्यांपूर्वी फॉक्सकॉनचे तैवानचे सीईओंची दिल्लीत भेट घेतली होती. प्रकल्प तळेगावला होणार हे देखील निश्चित झाले होते. मात्र, त्यानंतर आता प्रकल्प आपल्या हातातून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.