महाराष्ट्र

नवनीत राणा अडचणीत; अकोल्यात तक्रार दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 Sept :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अकोल्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राणा यांनी एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’ हा शब्द प्रयोग केल्याने दोन समाजात तेढ निर्माण केली, असा आरोप तक्रारकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जावेद जकेरिया यांनी केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या बातमीतून मुस्लिम समाजावर करण्यात आलेले आरोप व त्यातून दोन धर्मात वैर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप राणा यांच्यावर करण्यात आला आहे. सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेसचे जावेद जाकेरिया यांनी दाखल केली.

तक्रारीनुसार, 7 सप्टेंबर रोजी रोजी सोशल मीडियावर आरोपींबद्दल व्हिडीओसह एक बातमी फ्लॅश झाली होती. राणा या राजापेठ अमरावती येथील पोलिस ठाण्यात असताना पोलिस अधिकाऱ्यांवर बरसल्या. सतत त्या ‘लव्ह जिहाद’ चा उल्लेख करत होत्या. हे प्रकरण एका बेपत्ता मुलीशी संबंधित होते. परंतु विशिष्ट हेतूने आणि दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने मुलीला अन्य धर्माच्या मुलाने पळवून नेले असल्याचा आरोप करण्यात आला होता. मुस्लिम समाजातील मुलावर कारवाई करण्यासाठी त्या पोलिसांवर दबाव आणत होत्या.

अमरावती येथे ही घटना घडली असली, तरी हे वृत्त सर्वत्र पसरले. त्यामुळे ही तक्रार दाखल करीत असल्याचे जकेरिया यांनी म्हटले आहे. हिंदू मुली मुस्लीम मुलांसोबत पळून गेल्याच्या घटना घडल्या, अशी खोटी माहिती पसरविण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी खासदार राणा यांच्यावर केला आहे.

स्वतःच्या फायद्यासाठी समाजातील शांतता बिघडवण्याचे कृत्ये करीत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. हे कृत्य स्पष्टपणे दोन धर्म आणि समुदायांमध्ये वैर निर्माण करण्याच्या उद्देशाने आहे. त्यामुळे गुन्हा नोंदवून खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी विनंती तक्रारीतून जकेरिया यांनी केली आहे.