“फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका”; पेडणेकरांची नारायण राणेंवर टीका
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
12 Sept :- शनिवारी (१० सप्टेंबर) मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला.या आरोपानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली. आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे राहील. अशा प्रकारचे हल्ले करू नका. शेवटी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातच राहायचे आहे, असा इशाराही राणे यांनी ठाकरे गटाला दिला.
या इशाऱ्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी राणेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणेची इमेज सगळ्या महाराष्ट्राला माहीती आहे. फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका”. असं म्हणत त्यांनी राणेंवर टीका केली आहे.
नारायण राणे इशारा देताय की धमक्या देताय. महाराष्ट्रातलं सरकार धमक्या देणारं सरकार आहे का?, असं मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विचारावं असं वाटतंय. आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असं नारायण राणे म्हणताय. नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती आहे आणि आता ते आम्हाला सांगणार?, नारायण राणेंची इमेज संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे अशा फालतू धमक्या मुंबई आणि महाराष्ट्रात देऊ नका, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. पण त्यापूर्वी मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. आमच्यासारख्सा महिलांना पण कोणत्याही प्रकरणात गोवतात. आमच्या लोकांनी काही केले नसेल असे मी म्हणत नाही. पण केंद्रातले लोक इथं येऊन धमक्या देणार असतील तर आम्ही ऐकून घेणार नाही. आधी नाही ऐकले. आता ऐकणार नसल्याचे पेडणेकर म्हणाल्या.
“सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ५० लोक घरापर्यंत आले. मुंबईत शिंदे गटाची ताकद आहे की नाही हे आगामी काळात समजेल. मात्र शिंदे गटाची ताकद आम्हाला समजली आहे. सध्या जो गोंधळ उडाला, त्याची आम्ही दखल घेत नाही. जेव्हा दखल घेऊ तेव्हा त्यांना चालणे, बोलणे, फिरणे अवघड होईल. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आम्ही काम करू,” असा इशारा राणे यांनी दिला. तसेच राज्यात भाजपा-शिंदे गटाची सत्ता आहे. पोलिसांनीही त्याची खबर घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.