महाराष्ट्र

आ. सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल:शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांची कारवाई

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 Sept :- प्रभादेवी परिसरात काल रात्री ठाकरे गट व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. अखेर याप्रकरणी पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते खा. अरविंद सावंत यांनी दिली.

दरम्यान, हाणामारीप्रकरणी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असून 5 शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. यानंतर या 5 जणांची जामीनावर सुटका झाली असून त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर शिवसेना नेते खा. अरविंद सावंत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब यांनी दादर पोलिसस्टेशनमध्ये धाव घेतली व शिवसैनिकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंती पोलिसांना केली होती.

तसेच, हाणामारीदरम्यान आ. सदा सरवणकर यांनी गोळीबार केला असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करा, तोपर्यंत पोलिस स्टेशनसमोरून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेना नेते, व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. पोलिसांच्या भेटीनंतर खा. अरविंद सावंत म्हणाले, काल रात्री हाणामारी झाल्यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यासाठी आमचे विभाग प्रमुख महेश सावंत तक्रार करण्यासाठी दादर पोलिसांकडे आले होते. मात्र, त्यांच्यावरच चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी बंदुकीतून गोळीबार केला, अशी तक्रार असूनही पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. शेवटी आम्ही तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आमच्या तक्रारीची नोंद घेतली.

शिवसैनिकांना अटक झाल्याचे समजताच शिवसेना आक्रमक झाली आहे. दादर पोलिस स्टेशनसमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. जोपर्यंत अटकेत असलेल्या शिवसैनिकांची सुटका पोलिस करत नाहीत, तोपर्यंत पोलिस स्टेशनसमोरून हटणार नसल्याचे आंदोलक शिवसैनिकांनी म्हटले आहे.