शिंदे-ठाकरे गटात राडा; आ. सरवणकरांवर गोळीबाराचा आरोप
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 Sept :- दादर-प्रभादेवी परिसरात यावेळी प्रचंड तणावाचे वातावरण आहे. ‘आवाज करणार तर ठोकणारच, आज पेंग्विन सेनेला स्वतःची लायकी समजलीच असेल’, अशी अशा प्रकारची फेसबुक पोस्ट करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील संतोष तेलवणे या कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली आहे. प्रभादेवी परिसरात हा प्रकार घडला. त्यानंतर आता शिंदे गटातील लोकही मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना मारण्याची संधी शोधत आहेत.
याप्रकरणी दादर पोलिसांनी सुमारे 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, 5 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी आरोप केला आहे की, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी घटनास्थळी व नंतर पोलिस ठाण्यात आपल्या पिस्तुलाचा गैरवापर केला. पिस्तुलाच्या सहाय्याने त्यांनी शिवसैनिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या विभागप्रमुखाला लक्ष्य करत सरवणकर यांनी गोळीबार केला, मात्र ते सुदैवाने बचावले. या गोळीबारात एक पोलीस कर्मचारीही जखमी होता होता वाचला आहे. सदा सरवणकर यांना सत्तेचा अभिमान झाला आहे. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या घटनेवरून हे स्पष्टपणे दिसून येत आहे, असा आरोप सुनील शिंदेंनी केला आहे
शिंदे यांनी सांगितले की, शिवसैनिक या नात्याने शिंदे गटातील लोकांची कृती किती सहन करायची. शिंदे गटातील लोक शिवसेनेच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी करत आहेत, तसेच कोळी समाजाच्या स्थानिक शिवसेना नगरसेवकाविरोधात आणि त्यांच्या कोळी समाजाबाबत घाणेरडे वक्तव्य करत आहेत. शिवसैनिकांची चूक असेल तर नक्कीच आमच्यावर कारवाई करा, असे आम्ही पोलिसांना स्पष्टपणे सांगितले आहे. शिवसैनिक कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहेत. मात्र सत्तेच्या दबावाखाली शिवसैनिकांवरच कारवाई होत असेल, तर आम्ही खपवून घेणार नाही.
सदा सरवणकर यांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्याच्या आवाराबाहेर या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, गोळीबारासारखा काहीही प्रकार झालेला नाही. दोन कुटुंबात किरकोळ वाद होतात. गोळीबाराचा आरोप खोटा असल्याचे सांगून ते म्हणाले की, कोणी काहीही आरोप करत आहे.
गणपती विसर्जनाच्या निमित्ताने प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दादर-प्रभादेवी परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. शनिवारी शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी ‘आवाज करणार तर ठोकणारच. आज पेग्विन सेनेला स्वतःची लायकी समजलीच असेल’ अशी पोस्ट फेसबूकवर टाकताच शिवसैनिकांनी संतोषला मारहाण केली.