महाराष्ट्र

नाना पटोलेंची नितीन गडकरींना थेट ऑफर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 Sept :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. “नितीन गडकरींनी भाजपामध्ये घुसमट होत असल्यास काँग्रेसमध्ये यावं, त्यांची आम्ही साथ देऊ” असे अकोल्यामध्ये माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसने दिलेल्या या ऑफरला नितीन गडकरी काय प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर भाजपामध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस हा लोकशाही व्यवस्था मानणारा पक्ष आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक घेतली जाते, असे पटोले म्हणाले आहेत. देशात भाजपाविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते असा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या टी शर्टच्या किमतीवरुन पटोले यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. “काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे भाजपाला धडकी भरली आहे. त्यामुळेच टी शर्टच्या किमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत आहे”, असा पलटवार पटोले यांनी केला आहे. नरेंद्र मोदी १० लाखांचा सूट, १.५ लाखांचा चष्मा, ८० हजारांची शाल, ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात आणि फकीर असल्याचा कांगावा करतात, असा हल्लाबोलही पटोले यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे.