महाराष्ट्र

फडणवीस-शेलार समर्थक भिडले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 Sept :- दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील कुरार विलेज परिसरात गणपती विसर्जनाच्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे समर्थक आमनेसामने आले. कुरार गावात असलेल्या संस्कार शाळेच्या कोपऱ्यावर असलेल्या गणपती विसर्जन स्थळाजवळ दोन्ही गटात बाचबाची झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी गणपती विसर्जनासाठी जाणाऱ्या मंडळांसाठी स्वागत व्यासपीठ उभारले होते. जिथे गणेश भक्तांसाठी वडा-पाव वाटण्याचीही व्यवस्था होती. मिश्रा यांच्या व्यासपीठापासून सुमारे 20-25 फूट अंतरावर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे समर्थक विधान परिषद सदस्य राजहंस सिंह यांचाही मंच होता. राजहंस आधी काँग्रेसमध्ये होते आणि गुरुदास कामत यांच्या निधनानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना विधान परिषदेचे सदस्य करण्यात आले.

मिश्रा यांच्या व्यासपीठावरून वडापावचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तो घेण्यासाठी अचानक मोठ्या संख्येने गणेशभक्त आले. ही रांग लांबत जाऊन विधान परिषद सदस्य सिंह यांच्या व्यासपीठासमोर पोहोचली. त्यामुळे संतप्त झालेल्या राजहंस समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी रांगेत उभ्या असलेल्या गणेशभक्तांना तेथे उभे राहू नका, असे बजावले आणि नंतर ढकलून दिले. यावरून दोन गटात भांडण सुरू झाला आणि नंतर एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्यापर्यंत पोहचले.