महाराष्ट्र

नवनीत राणाविरोधात पोलीस पत्नी आक्रमक…दिला ‘हा’ इशारा…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 Sept :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात पोलीस पत्नी वर्षा भोयर ह्या पोलिसांच्या सन्मानासाठी आक्रमक झाल्या असून त्यांनी यासाठी आंदोलनाचे पाउल उचलले असून जो पर्यंत खासदार नवनीत राणा पोलिसांची माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा वर्षा भोयर यांनी दिला आहे. त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन आज आंदोलन केले आहे.

दोन दिवसांपूर्वी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती. घरातून बेपत्ता झालेली मुलगी लव्ह जिहाद प्रकरणात अडकली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी बाचाबाची करत जोरदार राडा घातला होता. संबंधित मुलगी सापडली असून ती घरगुती कारणातून एकटीच घरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

अमरावतीच्या वर्षा भोयर यांचे पती PSI पदावर कार्यरत असून त्यांचे सासऱ्यांनी सुद्धा पोलीस खात्यात सेवा दिली आहे, त्यामुळे त्यांना पोलिसांची काय अवस्था असते हे माहिती असून म्हणून त्यांनी नवनीत राणा यांच्या विरुद्ध बंड पुकारल्याचे दिसत आहे. दोन दिवसांत नवनीत राणांनी माफी मागितली नाही तर, आपण आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा पोलिसाच्या आंदोलक पत्नीने दिला आहे. पोलिसांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मुंबई किंवा दिल्लीला जाऊन आंदोलन करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत पोलिसाची आंदोलक पत्नी म्हणाल्या की, “नवनीत राणा आता तू माफी माग, मला मुंबईला जावं लागलं तरी जाणार, मला दिल्लीला जावं लागलं तरी जाणार, पण हे प्रकरण आता थांबणार नाही. जोपर्यंत तू माफी मागणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. मी इथे बसून आमरण उपोषण करेन. तुला माफी मागावीच लागणार आहे.

तू दहावी-बारावी पास झाली आहेस, इथे जे अधिकारी येतात…, ते यूपीएससी, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अहोरात्र जागरण करत मेहनत करतात. तूदेखील करोना काळात एका पोलीस अधिकाऱ्याचा ऑडिओ कॉल रेकॉर्ड करून व्हायरल केला होता. सर्वांना नियम सारखे असायला पाहिजेत, तिला कॉल रेकॉर्ड करून व्हायरल करण्याचा अधिकार कुणी दिला?” असा सवालही पोलिसाच्या कुटुंबियांनी विचारला आहे.

“नवनीत राणा तुझा निषेध असो, पोलिसांची हाय तुला सुखाने जगू देणार नाही. तू त्यांची बदनामी केली आहे, मी आता गप्प बसणार नाही, तू काहीही बोलली तरी मला आता फरक पडणार नाही. पण तुझ्याविरोधात आता मी अविरतपणे लढणार आहे. तू फक्त नौटंकी आहेस, नौटंकीच राहशील आणि नौटंकीच करशील” अशी प्रतिक्रियाही पोलिसाच्या पत्नीने दिली आहे.