महाराष्ट्र

दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 Sept :- गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दसरा मेळावा नेमका कुणाचा? यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. एकीकडे शिंदे गटाकडून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा दाखला देत दसरा मेळावा शिंदे गटाचाच होईल, असं सांगितलं जात असताना दुसरीकडे शिवसेनेकडून इतिहासाचा दाखला देत आजपर्यंत शिवसेनेचाच दसरा मेळावा होत आला आहे, असा दावा केला जात आहे.

या सर्व घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र अद्याप काही बोलले नव्हते. आता मात्र उद्धव ठाकरेंनी याबाबत मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपली भूमिका मांडली आहे.

आम्हीच खरी शिवसेना असा दावा करण्यासोबतच शिंदे गटानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील दावा सांगितला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात असताना काही दिवसांवर येऊन ठेपलेला दसरा मेळावा शिंदे गटाचाच होणार, असं सांगायला शिंदे गटातील नेतेमंडळींनी सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ भाजपामधूनही शिंदे गटाचाच दसरा मेळावा व्हायला हवा, असा दावा केला जात आहे. पोलिसांनी मात्र अद्याप दोन्ही अर्जांवर निर्णय दिलेला नाही.

यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा मला जे बोलायचंय ते बोलेनच. पण आता एक बरंय, की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच बोलावं लागायचं. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचंय ते मी बोलेन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मला कसलीच चिंता नाही. जे काही आहे, ते माझं नाहीये. माझी काही खासगी मालमत्ता नाहीये. मुख्यमंत्रीपद जर मला पाहिजे असतं, तर मी एका क्षणात ते सोडू शकलो नसतो. आपल्याकडे ३०-४० आमदार तेव्हा होतेच. मला मुख्यमंत्रीपदावर चिकटून राहायचं असतं. तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.