महाराष्ट्र

गुलाबराव पाटलांची जीभ घसरली! म्हणाले, आदित्य ठाकरे गोधडीत…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 Sept :- “अदित्य ठाकरे गोधडीत नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत” असे म्हणत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटचे वारसदार असून विचारांचे वारसदार नाहीत. तसेच आपण अलिबाबा चालिस चोर प्रमाणे शिंदे बाबा के चालिस आमदार असल्याचेही पाटील म्हणाले. ते जळगावात एका कार्यक्रमात बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, “हा 35 वर्षांचा मुलगा येतो आणि आमच्यावर टीका करतो, त्याला आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होत आहे. गेल्या 35 वर्षात आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते 32 वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं. तू गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत” असा एकेरी उल्लेख पाटलांनी केला.

पुढे पाटील म्हणाले की, बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मोठे केले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. ‘व्हू इज आदित्य ठाकरे’ असा सवाल देखील गुलाबरावांनी केला. आम्ही गद्दार आहे म्हणून त्यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करत तुम्ही गद्दारी केली, असेही ते म्हणाले.

पुढे पाटील म्हणाले की,”आता आम्हाला काही लोकं म्हणतायेत की, तुम्हारा क्या होंगा कालिया, तर मी त्यांना म्हणतो, जो होंगा वो होंगा, गब्बर सेठ खडा हुआ है” अशी फिल्मी डॉयलॉगबाजी त्यांनी केली. राजकारणामध्ये परिणामांचा विचार करणे चालत नाही. संघर्ष जीवनाच्या यात्रेत असले पाहिजे, देव आपल्यासोबत असतो, संघर्षाशिवाय तुम्ही मोठे होऊ शकत नाही.

पुढे पाटील म्हणाले की, मी गुवाहाटीत गेलो, त्यावेळी घरचे म्हणे की, तुम्ही परत या. ती एक जीवनाची कहानी असून इतिहास लिहला जाईल तेव्हा आमचेही नाव येईल. आपण अलिबाबा चालिस चोर प्रमाणे शिंदे बाबा के चालिस आमदार आहोत, टीका करणाऱ्याला करून द्या.

शिवसेना कुणाची हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, “शिवसेना कुणाची हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय. शिवसेना आमचीच आहे. आम्ही काय कमळावर उभे आहोत का? आमचं त्यांच्याशी लवमॅरेज होतं म्हणून आम्ही आय लव यू म्हटले, बाकी काय केले. त्यामुळे शिवसेना आमचीच आहे, आम्ही बाळासाहेबांनी, दिघेंना सोडलेले नाही, पक्षही सोडले नाही.” असे पाटील म्हणाले.