महाराष्ट्र

बाळासाहेबांचा मुलगा म्हणून किती वर्ष ब्लॅकमेल करणार?- रामदास कदम

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Sept :- बाळासाहेबांचा मुलगा म्हणून किती वर्ष ब्लॅकमेल करणार? बाळासाहेबांचे विचार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होते. मग जेव्हा राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात. तेव्हा तुम्हाला बाळासाहेबांच्या विचारांची आठवण झाली का, असा सवाल करत शिंदे गटात गेलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.

पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर मीदेखील महाराष्ट्रात फिरणार. नेमकी वस्तुस्थिती महाराष्ट्राला सांगणार आहे. उद्धवजींना जे मिळाले ते बाळासाहेबांचा मुलगा म्हणून आणि आदित्यला मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून, पण पक्ष संघटना आम्ही वाढवली. आता सगळ्यांना भेटीगाठी सुरू आहेत. उरलेल्या आमदारांच्या भेटी, शाखा प्रमुखांच्या भेटी सुरू आहेत. मग गेल्या अडीच वर्षात काय झाले होते. आजारपण तर दोन अडीच महिने होते. आता उद्धव ठाकरे यांनी भावनात्मक डायलॉग बाजी थांबवावी.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या अडीच वर्षांत तीनदा मंत्रालयात आले होते. यासाठी त्यांची गिनीज बुकामध्ये नोंद झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवस-रात्र काम करत आहेत. मुख्यमंत्री कसा असावा शिंदे यांनी दाखवून दिल्याचेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही व्यक्ती अनुभवी आहेत. एक से भले दो याप्रकारे ते महाराष्ट्र विकासाचा गाडा पुढे नेत आहेत. त्याचा मला अभिमान वाटत आहे. हा मुख्यमंत्री आमचा आहे, ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे.

उद्धव यांच्यावर टीकेची झोड उठवत शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कामांचा पाढा त्यांनी वाचला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. पोलिसांना 15 लाख रुपयांत घरे हा सगळ्यात चांगला आणि मोठा निर्णय तातडीने घेतला. जे पोलिस दिवसरात्र रक्षणासाठी काम करतात, त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी कोकणवासीयांसाठी खास जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी 400 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. यावरून रामदास कदम यांनी श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्याच्या कुटुबांतील एका व्यक्तीने गणेश भक्तासाठी 400 बसेस दिल्या, हे पहिल्यांदा घडले आहे. त्यामुळे स्व:तासाठी जगाला तो मेला. जो दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगाला, असेही ते म्हणाले.