क्रीडा

तेंडुलकर, युवराज बॅट घेऊन उतरणार मैदानात?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Aug :- क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करून बराच काळ लोटला. मात्र क्रिकेटप्रेमींमध्ये मराठमोळ्या तेंडुलकरची अजूनही तेवढीच क्रेझ आहे. सचिन मैदानात दिसताच प्रेक्षक त्याच्या नावाचा जयघोष करतात. आता सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा बॅट हातात घेणार आहे. तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात पुन्हा एकदा सहभागी होण्याची शक्यता आहे. याआधीही त्याने पहिल्या हंगामात भारत लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज येत्या १० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधित खेळवली जाणार आहे. या सिरीजमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतील. सचिन तेंडुलकरसोबतच युवराज सिंगदेखील भारत लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. सचिनने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या हंगामातही सहभाग नोंदवला होता. सचिनसोबत नमन ओझा, इरफान पठाण, युसूफ पठाण, राहुल शर्मा तसेच युवराज सिंगसह इतर खेळाडूदेखील दिसतील.

या सिरीजसाठी सर्व खेळाडू ७ सप्टेंबर रोजी लखनऊ येथे जमणार आहेत. त्यानंतर १० ते १५ सप्टेंबर पर्यंत येथे सुरुवातीचे पाच सामने खेळवले जातील. त्यानंतर पुढचे पाच सामने १६ ते १९ सप्टेंबर या कालावधीत जोधपूर येथे होणार आहेत. त्यानंतर कटक येथे २१ ते २५ सप्टेंबर या कालावधीत एकूण सहा सामने खेळवले जातील. तर बाद फेरीचे सामने २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात होतील.

या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात एकूण सात संघांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षी न्यूझीलंड लिजेंड्स या आणखी एका संघाचा समावेश होणार आहे. म्हणजेच या हंगामात इंडिया लिजेंड्स, ऑस्ट्रेलिया लिजेंड्स, श्रीलंका लिजेंड्स, वेस्ट इंडिज लिजेंड्स, दक्षिण आफ्रिका लिजेंड्स, बांगलादेश लिजेंड्स, इंग्लंड लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स असे एकूण आठ संघ सहभागी होतील.