पंकजा मुंडेंनी वाट न पाहता वरिष्ठांकडे दाद मागावी; एकनाथ खडसे यांचा सल्ला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
31 Aug :- पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदासाठी वाट न पाहता थेट वरिष्ठ नेतृत्वाकडे जाऊन दाद मागावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्यानंतर आता खडसेंनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे भाजपच्या विस्तारासाठी काम केले आहे. मात्र, एक गोष्ट खरी आहे की, पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला आहे. तशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. त्यांना राष्ट्रवादीत यायचे की नाही? हा त्यांचा निर्णय आहे.
राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंडे समर्थक पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावर वर्णी लागावी अशी मागणी करत आहे. शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. विधान परिषदेतही भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर कार्यकर्ते भाजपविरोधात आक्रमक झाल्याने पाहायला मिळाले होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे.
एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु ज्या पद्धतीने तिकीट द्यायचं आणि त्यांनाच पाडायचे असे सूडाचे राजकारण भाजप करत आहे. रोहिणी खडसे यांच्या हे लक्षात आले असून, पंकजा मुंडे यांच्याही आता ते लक्षात आले पाहिजे. आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवण्याचे काम करणाऱ्यांचे पंख छाटले जातात. तुमच्या पक्षात तुम्हाला भाजपा बाजूला कसे ठेवतंय हे तुम्ही ओळखणे गरजेचे आहे, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीची ऑफर दिली होती.
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. औरंगाबादसह अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला होता. त्यानंतर आता राज्यात भाजपचे सरकार येऊनही पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.