महाराष्ट्र

घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन…!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Aug :- गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया….अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट… आज श्री गणेश चतुर्थी… ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे.

सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला प्रारंभ होईल. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.

गणेशोत्सवाच्या शुभप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प करूया. असे म्हणत यावर्षीचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशाचे आगमन आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येवो. त्याचबरोबर गणेशोत्सव साजरा करताना सर्वांनी सामाजिक भान राखणे गरजेचे आहे. राज्यातील गणेश मंडळाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपती सोबतचा फोटो शेअर केला असून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशाची पूजा करत असतानाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गणरायांची पूजा केली. यावेळी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजपचे अतुल सावे उपस्थित होते.

विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. महाराष्ट्राची सर्वांगीण विकासाच्या दिशेची वाटचाल श्रीगणरायांच्या कृपाशिर्वादानं अधिक गतिमान होवो असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी कुटुंब, मित्र, नातेवाईक, एकमेकांच्या सोबतीने आनंदाच्या, उत्साहाच्या, भक्तीमय वातावरणात, शिस्त व नियमांचं पालन करुन साजरा करुया असं अवाहनही अजित पवारांनी केलं आहे.