महाराष्ट्र

आमदार संतोष बांगरांची पुन्हा शिवीगाळ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Aug :- राज्यात आरोग्य विभागाच्या 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना मंगळवारी (30 ऑगस्ट) दुपारी दूरध्वनीवरून चांगलेच खडसावले. कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन देण्याबाबत सूचनाही त्यांनी दिल्या. तर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही स्पष्ट केले.

राज्यात आरोग्य विभागाच्या 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालविल्या जात असून यामध्ये रुग्णांची वाहतूक करणे, गरोदर महिलांना उपचारासाठी आणणे तसेच त्यांना परत नेऊन सोडणे यासह इतर कामे रुग्णवाहिकेवरील चालकांना करावी लागतात. राज्यभरात सुमारे 2000 चालक कार्यरत आहेत. मागील 10 ते 12 वर्षापासून हे चालक प्रत्येक जिल्हयात काम करतात. या चालकांना कंत्राटदारांकडून 19900 रुपये दरमहा वेतन अदा करणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात काही चालकांना 7000 तर काही जणांना 8000 ते 9000 रुपये वेतन दिले जाते. मात्र, तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या चालकांंना पूर्ण वेतन दिले जात नाही.

शिवाय मागील सहा महिन्यापासून चालकांना अनियमितपणे वेतन दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सुर उमटू लागला होता. नियमित वेतनासंदर्भात चालकांनी संबंधित कंत्राटदारांकडे विचारणा केली असता त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली जाऊ लागली होती. या प्रकारानंतर आज हिंगोलीसह इतर जिल्ह्यातील सुमारे 100 पेक्षा अधिक चालकांना आमदार संतोष बांगर यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

यावेळी आमदार बांगर यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मीटिंगमध्ये असल्याचा संदेश पाठविला. यामुळे संतापलेल्या आमदार बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा दूरध्वनीवरून संपर्क साधून चांगलेच फैलावर घेतले.

राज्यातील 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकांना कंत्राटदारांकडून योग्य वेतन दिले जात नाही. अनेकांना कमी वेतन दिले जात आहे. याकडे लक्ष द्या अन्यथा त्यांचे कंत्राट रद्द करा, अशा शब्दात स्पष्ट सूचना दिल्या. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही तक्रार करणार असल्याचे आमदार बांगर यांनी स्पष्ट केले.