महाराष्ट्र

शिंदे गट, शिवसेना वादात रामदेव बाबांची ठिणगी! म्हणाले, बाळासाहेबांचे उत्तराधिकारी…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Aug :- बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचे आत्मीय प्रेम होते. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकाऱ्याच्या रुपात पाहतो. असे विधान योगगुरु रामदेव बाबा यांनी सीएम शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर केले आहे.

योगगुरु रामदेव बाबांनी मंगळवारी (दि.30) नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. सध्या त्यांच्या या राजकीय भेटींच्या चर्चांना उधाण आले आहे. या दोन्ही भेटींमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. खरी शिवसेना कुणाची इथपासून ते हिंदुत्ववादी भूमिका कोणाची यावरुन मोठ्या प्रमाणात वाद रंगत आहेत. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आता या वादात नवी ठिणगी पडल्याचे दिसून येतेय. एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून रामदेव बाबांनी या वादात उडी घेतली आहे.

रामदेव बाबा म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या हिंदु धर्माचे, सनातन धर्माचे गौरवपुरुष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते सनातन धर्म, ऋषीधर्म प्रामाणिकपणे निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आमचे आत्मीयतेचे संबंध होते. शिंदे हे बाळासाहेबांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत. त्यामुळे या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेसाठीही प्रयत्न करा, अशी विनंती शिंदेंना केल्याचे रामदेव बाबांनी सांगितले.