खैरे ढगात गोळ्या मारतात; शहाजीबापूंची टीका!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
30 Aug :- मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दोन चांगले बंगले भाड्याने घेऊन ठेवतो. त्यांनी तिथे येऊन राहावे आणि लोकांचे कामे करावे, असे म्हणत शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले, ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
शहाजीबापू म्हणाले की, मला पाडण्याची धमकी दिली जात आहे. माझी त्यात चांगली प्रॅक्टीस झाली असून, मी सात-आठ वेळा धडाधड पडलो. माझी एवढी प्रॅक्टीस महाराष्ट्रात कुणालाच झालेली नाही. राजकारण हे चालतच असते, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
आमच्यासोबत शिंदे गटातील 10-15 आमदार संपर्कात असून, ते शिवसेनेते येण्यासाठी तयार आहेत, या खैरे यांच्या दाव्यावर उत्तर देताना शहाजीबापू म्हणाले की, “दहा ते पंधरा म्हणजे किती, आकडा 10 धरायचा की 15 धरायचा. ते ढगात गोळ्या मारतात त्यांना काही उद्योग राहिलेले नाही, तसेच त्यांना आता सगळं काही कळून चुकलेले आहे. ते शेवटच्या गटांगळ्या मारत आहेत.”
‘मविआ’तील आमदार शिंदे गटावर 50 खोके घेतल्याचा आरोप करत आहेत. त्या खोक्यावर बोलताना शहाजीबापू म्हणाले की, “कोणत्या गोष्टीकडे आपण कसे बघावे हे ज्याच्या त्याच्या आत्म्यावर, बुद्धीवर अवलंबून असते. इतिहास त्याची क्रांती म्हणून नोंद होणार आहे, पण ज्यांच्या सत्ता अचानक रातोरात गेल्या. ते सकाळी उठून अंगोळ करत होते. आता मंत्रालयात जायचे म्हणून पण बाहेर येऊन पाहिले तर पीए वगैरे कोणीच नव्हते. त्याचे मंत्रिपद पंचर झाले.
शहाजीबापू पुढे म्हणाले, “आता आम्हाला गद्दार म्हणताय, कोणी खोके म्हणताय. ते वैतागले असून, खोके, पेट्या काहीही म्हणतात, आम्हाला फक्त डाळिंब म्हणणारा खोके माहिती आहे. ज्यांची संस्कृती मुळात खोक्यांवर अवलंबून आहे, अशा मनोवृत्तीवालेच खोक्याची भाषा करत आहेत. ग्रामपंचायतचा एक सदस्य फोडला तर रात्रीच्या झोप उडतात इथे आम्ही 50 जण सूरतला, गुवाहाटीला त्यानंतर पुन्हा गोव्याला हे इतके सोपे नव्हते. सगळ्यांच्या मनात जे होते ते घडलेले आहे.”
शहाजीबापू म्हणाले की, “राज्यात एक क्रांतिकारक घटना घडली असून, एक नवे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. हे सरकार अडीच वर्षांपूर्वीच स्थापन होणार होते, पण काही राजकीय घटनांमुळे हे सरकार बनू शकले नाहीत. मात्र, आता राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून, चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. मला विश्वास आहे की, शिंदे-फडणवीस सरकार लोकाभिमुख ठरेल, चांगले काम करेल आणि जनतेच्या समस्या सोडवण्यास आम्हाला चांगले यश येईल.”
पुढे दसरा मेळाव्याबाबत बोलताना शहाजीबापू म्हणाले की, “काल मी दिवसभर मंत्रालयात होतो. त्यात कुठेही मला दसरा मेळाव्या संदर्भातले वातावरण पाहायला मिळाले नाही. अजून मेळाव्याला महिना सव्वा महिन्याचा कालावधी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. उद्धव ठाकरे यांनी जर हिंदू हृदयसम्राट यांच्या विचारांवर प्रामाणिकपणे काम केले असते, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती घडली असती का? असा प्रश्न देखील यावेळी शहाजी बापूंनी विचारला.
शहाजीबापू म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे असते तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती झाली असती का? ते म्हणाले असते की, कशाला त्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचे. हे विचार बाळासाहेबांचे होते, तो बेस आता उद्धवस्त झाला. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. राजकारणात लोकांना उत्तर देण्यासाठी आम्हाला अनेक अडचणी निर्माण झाल्या. तुम्ही काँग्रेसला श्रय देत होता, असे आरोप आमच्यावर करण्यात आले.”