पवारांचे मोदी सरकारवर टीकास्त्र! म्हणाले, ‘अच्छे दिन’ आले…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
29 Aug :- राज्यात अनेक प्रश्न आहेत, राज्याचे आणि देशाचे सूत्र हातात असलेले एकाच विचाराचे आहेत. निवडणूकांना सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने अच्छे दिन अशी घोषणा केली होती, त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना दिसले नाही. पुढच्या निवडणूकीच्या वेळी त्याचे विस्मरण झाले. आता 2024 साठी आता 5 ट्रीलियन इकॉनॉमी हे नवीन आश्वासन दिले जात आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.
मी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यावा. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी विदर्भाचा दौरा केला. मी देखील काही निवडक जिल्ह्यात जात आहे. त्यांची सुरुवात मी आजपासून ठाण्यापासून केली आहे, असे त्यांनी सांगितले.
2022 पर्यंत प्रत्येकाजवळ हक्काचे पक्के घर असेल, प्रत्येक घरात पाण्याचा नळ असेल, 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत इंटरनेट सुविधा असेल. डिजिटल इंडीयाचा नारा देण्यात आला होता. पण तसे झाले नाही. 2022 पर्यंत देशातील प्रत्येक घराला टॉयलेट उपलब्ध असेल हे आश्वासन देखील पूर्ण झाले नाही. 44 टक्के देशातील लोकांना अजुनही वीज मिळालेली नाही, ही आकडेवारी केंद्राची आहे, असे ते म्हणाले. यावेळी पवारांनी भाजपने दिलेल्या आश्वासनाची यादी देखील वाचून दाखवली
पुढे पवार यांनी सांगितले की, विरोधी पक्ष जर सत्तेत असतील तर त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे. माणसे फोडणे, साधणांचा वापर करणे आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गंभीर चित्र आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा असे प्रकार झाले.
महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही लोक फोडले आणि सरकार स्थापन केले. त्यामुळे देशातील बिगरभाजप पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधून लोकशाही मार्गाने आलेली सरकारे पाडण्याचे जे कृत्य सुरू आहे, त्याविरोधात जनमत तयार करण्यासाठी लढा उभा करण्याचा आम्ही विचार करत आहोत
महिलाच्या सुरक्षेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदी यांचं 15 ऑगस्टच भाषण ऐकल, त्यामधे स्त्री वर्गाबाबत ते बोलले होते. पण, भाजपच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना गुजरात सरकारने त्यांना सोडले आणि त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मोदींच्या राज्यात एका महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना सोडण्यात आले आहे. हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे.