महाराष्ट्र

यंदा दसरा मेळावा शिवसेनेचा नसून शिंदे गटाचाच होणार? नरेश म्हस्केंचं मोठं विधान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Aug :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे ती दसरा मेळाव्याची. दरवर्षी ही चर्चा ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ अशी सुरू असते. यंदा मात्र ती चर्चा ‘नेमका कुणाचा दसरा मेळावा?’ अशा सुरू आहे. त्याला कारण ठरली ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी केलेली बंडखोरी.

सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे सरकार पडलं आणि भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर शिंदे गटानं जसा मूळ शिवसेना आमचीच आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण आमचाच अशी भूमिका मांडली, तसा आता दसरा मेळाव्यावरही शिंदे गटानं हक्क सांगितला असून त्यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मोठं विधान केलं आहे.

शिवसेनेचे दोन तृतियांशहून जास्त लोकप्रतिनिधी शिंदे गटात असल्यामुळे शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे परिणामी शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील शिंदे गटाचा हक्क असल्याचं सांगितलं जात आहे. पण आता मात्र शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यासोबतच शिवसेनेच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळता दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यावरच शिंदे गटानं हक्क सांगितला आहे. एवढंच नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचा दावाच शिंदे गटाकडून केला जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी “दसरा मेळावा शिवसेनेचाच होता आणि शिवसेनेचाच राहील” अशी ठाम भूमिका मांडली होती. मात्र, अद्याप प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नसून हे गद्दार राजकारण करत असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली होती. मात्र, त्यानंतर आता शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी एक मोठं विधान केलं आहे.